मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, डायल ११२ तत्परतेत राज्यात सर्वप्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 15:05 IST2024-02-20T15:04:58+5:302024-02-20T15:05:26+5:30
Mira Bhayander News: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची डायल ११२ ही यंत्रणा जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल आली आहे.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, डायल ११२ तत्परतेत राज्यात सर्वप्रथम
- मंगेश कराळे
नालासोपारा - नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची डायल ११२ ही यंत्रणा जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्तालय हे नागरिकांना पोलीस मदत पोहचिवण्यात संपुर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आले आहे. नियंत्रण कक्षात ६ अधिकारी, २४ कर्मचारी २४ तास ऑन ड्यूटी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षात कार्यरत असतात.
सर्वसामान्य नागरीकांनी पोलीस मदतीकरीता डायल ११२ वर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्तालयातील १७ पोलीस ठाण्यापैकी नालासोपारा पोलीस ठाणे नागरीकांना मदत पोहचविण्यात प्रथम क्रमांकावर आलेले असून त्यांचा वेळ १ मिनिटे ३४ सेकंद असा आला आहे. तर आयुक्तालयाचा सरासरी वेळ २ मिनिटे ३७ सेकंद आहे. तसेच यापुढेही पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना तात्काळ पोलीस मदत पोहचिवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षास, नागरीकांकडून दररोज सरासरी २०० ते २२० तर महिनाभरात एकूण ६३०५ तक्रारींचे कॉल प्राप्त झाले आहेत. त्याकरीता पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी कमीत कमी वेळात नागरीकांना पोलीसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल यादृष्टीने मार्गदर्शन केले. सर्व बिट मार्शल व पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरीकांच्या प्रति संवेदनशिलता वाढविणेकरीता आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियंत्रण कक्षामार्फत रोजच्या रोज याबाबत आढावा घेऊन प्रतिसाद वेळ जास्त देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक ते व्यक्तीगत मार्गदर्शन केले जाते.
पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात डायल ११२ यंत्रणेला काही वाहने व प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टिम अंतर्गत तत्काळ पोलिस मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायल ११२ योजना आयुक्तालयातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.