मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई उद्घाटन  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:30 PM2020-09-30T17:30:26+5:302020-09-30T21:05:31+5:30

पोलीस आयुक्तालयाचे कार्यालय व कामकाज प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने या दोन्ही शहरातील नागरिकांची आयुक्तालयाची प्रतीक्षा संपणार आहे. 

Mira Bhayander, Vasai-Virar Police Commissionerate will be inaugurated by the Chief Minister | मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई उद्घाटन  

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई उद्घाटन  

googlenewsNext

मीरा रोड - मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई-उद्घाटन उद्या गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे. मीरा रोडच्या राम नगर येथे पोलीस आयुक्तालयाचे कार्यालय व कामकाज प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने या दोन्ही शहरातील नागरिकांची आयुक्तालयाची प्रतीक्षा संपणार आहे. 

मीरा-भाईंदर आणि वसई-विरारची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय हवे, अशी या भागातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. सुरुवातीला सागरी आयुक्तालयाचा प्रस्ताव होता. नंतर मीरा-भाईंदर ठाणे पोलीस आयुक्तालयाला जोडण्याचा मुद्दा चर्चेत आला. तर मीरा-भाईंदर मुंबईला लागून असल्याने ते मुंबई पोलीस आयुक्तालयाला जोडावे, अशी शहरवासीयांची मागणी होती.  नंतर गोराई - मनोरीसह मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाची चाचपणी केली गेली. 

वाढत्या लोकसंख्येसह गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या विविध प्रकारांचे वाढते प्रमाण पाहता ग्रामीण पोलिसांच्या कारभाराचे ऐवजी आयुक्तालयाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. त्यातच गुन्हेगारांसह राजकीय गुन्हेगारीदेखील या परिसरात चिंतेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मीरा-भाईंदर व वसई-विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय जाहीर करण्यात आले. परंतु निवडणुकांच्या तोंडावर जाहीर झालेले आयुक्तालय केवळ कागदावरच होते. 

महाविकास आघाडी शासन आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी पोलीस आयुक्तालय अमलात आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आणि पहिले पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते ह्यांच्या सारख्या अतिशय अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. दाते ह्यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून ह्या दोन्ही शहरातील पोलीस ठाण्यांसह एकूणच नागरिकांच्या समस्या, पोलीस बाळाची संख्या, गुन्हेगारी, भौगोलिक आणि सामाजिक रचना आदींची माहिती करून घेतली.  

सदर पोलीस आयुक्तालयात मीरा-भाईंदरमधील ६ आणि वसई-विरार मधील ७ अशी एकूण १३ पोलीस ठाणी आहेत. याशिवाय मीरा-भाईंदरमध्ये खारीगाव आणि काशिगाव अशी २ तर वसई-विरारमध्ये पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळिंज व नायगाव अशी ५ नवीन पोलीस ठाणी होणार आहेत. आयुक्तालयात ५ डीसीपी असणार आहेत. तर मीरा-भाईंदरमध्ये १ व वसई-विरारमध्ये २ झोन केले जाणार आहेत. 

पहिले पोलीस आयुक्त दाते यांच्या कार्यालयासाठी जागा नव्हती. मीरा रोडच्या राम नगर येथील प्रभाग समिती कार्यालयाची जागा निश्चित केली असताना पालिकेतील सत्ताधारी भाजपाने मात्र आडमुठेपणा घेतल्याची टीका झाली. त्यानंतर महापौरांनी बैठक घेऊन राम नगर येथील इमारत आयुक्तालयासाठी तर कनकिया  येथील पालिका इमारत पोलीस उपायुक्त कार्यालयाकरिता २ वर्षे भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राम नगर इमारतीत पोलीस आयुक्तालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. येथील कार्यालये अन्यत्र हलवण्यात आली असून, नोंदणी आदी कार्यालय लवकरच हलवण्यात येणार आहे. इमारतीच्या आतील भागात रंगरंगोटी, फर्निचर आदींचे काम सुरू आहे. 

राम नगर येथील पालिका इमारतीत पोलीस आयुक्तालय १ ऑक्टोबरपासून सुरू केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते केले जाणार आहे. ऑनलाइन उद्घाटनास गृहमंत्री अनिल देशमुख , राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, दोन्ही क्षेत्रांतील २ खासदार, ४ आमदार, महापौर आदींना निमंत्रण दिले गेले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे उद्घाटनाचा सोहळा प्रत्येक पोलीस ठाण्यात लाईव्ह स्क्रीनवर दिसणार असून, त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार ह्यांना निमंत्रित केले गेले आहे. 

Web Title: Mira Bhayander, Vasai-Virar Police Commissionerate will be inaugurated by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.