मीरा भाईंदरकरांचा यंदा गृहसंकुलातच गणेश विसर्जनावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:21+5:302021-09-21T04:45:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड - मीरा भाईंदरमध्ये यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला होता. अनेक ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - मीरा भाईंदरमध्ये यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला होता. अनेक ठिकाणी इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती स्थापन झालेली पाहायला मिळाली. तर बहुतांश नागरिकांनी गृहसंकुलातच मोठ्या टाक्या किंवा टँक ठेवून त्यातच गणरायाचे मोठ्या भक्तीभावाने विसर्जन केलेले दिसले. मीराभाईंदरकरांच्या पर्यावरणपूरक बांधीलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जाणाऱ्या मूर्त्या व त्यावर वापरले जाणारे घातक रासायनिक रंग यामुळे जलप्रदूषण होऊन पर्यावरणाला तसेच जलजीवांना मोठी हानी सहन करावी लागते. शिवाय पीओपीच्या मूर्त्या ह्या पाण्यात विरघळत नसल्याने अशा मूर्त्यांचे सांगडे चिखलात रूतून राहतात. त्यामुळेच मातीच्या किंवा इकोफ्रेंडली मूर्त्यांचा वापर गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात केला जाण्याचे आवाहन सतत केले जाते. न्यायालयाने देखील पीओपीच्या मूर्त्या बंद करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय पीओपी मूर्त्यांचे विसर्जन थेट तलाव, खाडी, समुद्र वा नदीत केल्यास जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची सतत हानी होत आहे.
कोरोना संसर्गामुळे सर्वच उत्सवांवर निर्बंध आले असून अनेक नियम बनविले गेले. जागरूक नागरिकांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्त्या आणल्या. पर्यावरणपूरक मूर्त्याकडे कल वाढता असताना दुसरीकडे विसर्जनसुद्धा इमारत - गृहसंकुलच्या आवारात करण्यावर नागरिकांनी भर दिला होता. गृहसंकुलात कृत्रिम हौद उभारून ते फुले, रांगोळ्यांनी छान सुशोभित करून मोठ्या उत्साहात तिथेच गणेश मूर्ती विसर्जन केल्या गेल्या.
मीररोडच्या शांतीपार्क भागातील पूनम इस्टेट क्लस्टर १ ह्या गृहसंकुलात तसेच रामदेव पार्क येथील सिल्वर स्प्रिंग मित्रमंडळाच्या वतीने एन जी सिल्वर स्प्रिंग गृहसंकुलात कृत्रिम हौदात गणेश मूर्त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था केली होती. यासह अनेक गृहसंकुलातील कृत्रिम हौदात, काहींनी घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन केले.