मीरा-भाईंदर रेल्वे स्थानके हायटेक होणार; खासदार राजन विचारे यांनी घेतला कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 01:32 PM2023-11-30T13:32:56+5:302023-11-30T13:34:13+5:30
मार्च २०१९ ला रेल्वे बोर्डाकडून ९५० कोटींची मंजुरी या प्रकल्पासाठी मिळविली.
शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मिरारोड व भाईंदर या दोन रेल्वे स्थानकांचा डेक लेवलवर होत असलेल्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी आज एमआरव्हीसी व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली. खासदार राजन विचारे यांनी गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांच्याच पाठपुराव्याने सन २०१७-१८ मध्ये मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला असता एमआरव्हीसी ने MUTP 3A च्या प्रकल्पामध्ये १९ रेल्वे स्थानकांचा विकास प्रकल्प अहवाल बनविण्यात आला होता.
मार्च २०१९ ला रेल्वे बोर्डाकडून ९५० कोटींची मंजुरी या प्रकल्पासाठी मिळविली. त्यामध्ये मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकांचा समावेश करून ११० कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी मिरारोड रेल्वे स्थानकासाठी ६० कोटी व भाईंदर रेल्वे स्थानकासाठी ५० कोटी खर्च करणार आहेत. त्यानंतर एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वे मार्गावर ७ रेल्वे स्थानके व मध्य रेल्वे मार्गावर १० रेल्वे स्थानके अशी एकूण अंतिम १७ रेल्वे स्थानकांच्या विकासासाची कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरा रोड व भाईंदर या रेल्वे स्थानकांचा बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर डेक लेवलवर होणाऱ्या विस्तारीकरण कामाची पाहणी करण्यात आली.
या दोन्ही रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व अपुरे पडणारे फलाटे यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकात अस्तित्वात असलेले ४ + २ असे एकूण सहा फलाट तयार होणार आहेत व भाईंदर रेल्वे स्थानक येथील फलाटांची संख्या ६ + १ असे एकूण सात फलाट होणार आहेत. भविष्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांना या रेल्वे स्थानकात थांबा मिळू शकेल. आज या केलेल्या पाहणी दौऱ्यात फलाटावरील पहिल्या मजल्यावरील डेक लेवलची पाहणी केली. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकातील सुरु असलेली कामे मार्च २०२५ मध्ये पूर्ण करणार व भाईंदर रेल्वे स्थानकात फेब्रुवारी २०२४ मध्ये काम सुरु होऊन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून देणार, असे आश्वासन एमआरव्हीसीचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर विलास वाडेकर यांनी खासदार राजन विचारे यांना दिले आहे.