मीरा-भाईंदरची परिवहन सेवा पंक्चर

By admin | Published: December 2, 2015 12:21 AM2015-12-02T00:21:15+5:302015-12-02T00:21:15+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेची परिवहन सेवा चालवणाऱ्या ठेकेदार कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चरकडे कर्ज व त्याच्या व्याजापोटी तब्बल १६ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने

Mira-Bhyander's Transportation Service, Panchktra | मीरा-भाईंदरची परिवहन सेवा पंक्चर

मीरा-भाईंदरची परिवहन सेवा पंक्चर

Next

मीरारोड : मीरा-भार्इंदर महापालिकेची परिवहन सेवा चालवणाऱ्या ठेकेदार कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चरकडे कर्ज व त्याच्या व्याजापोटी तब्बल १६ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यास परस्पर रक्कम देऊ नये असे पत्र स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या शाखेने पालिकेला दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शहरातील परिवहन सेवा धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
नव्या बस खरेदीत स्वत:चा ५० टक्के वाटा भरण्याकरिता कंत्राटदाराने बस तारण ठेवून कर्ज काढल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्जाची व थकबाकीची रक्कम मोठी असल्याने नेमक्या कर्जाची रक्कम व बसची संख्या किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत २५० बस मिळण्याचा प्रस्ताव पालिकेने दिला असता ५० टक्के अनुदानातून सुरुवातीला ५० बसची खरेदी मंजूर झाली. परंतु बस खरेदीसाठी ९ कोटी ८८ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च असल्याने त्यातील ५० टक्के रक्कम पालिकेला भरावी लागू नये म्हणून पीपीपी तत्त्वावर ठेकेदार नियुक्त करुन त्याच्याकडून ५० टक्के रक्कम भरुन घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर या नवनियुक्त ठेकेदाराने बस खरेदी किमतीच्या ५० टक्के इतकी रक्कम म्हणजेच ४ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये ९ एप्रिल २०११ रोजी पालिकेत जमा केले. सदर रक्कम जमा करण्यास ५ महिन्यांचा विलंब झाला. शिवाय आधीच्या ठेकेदाराच्या ५२ बसदेखील कॅस्ट्रलकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. वास्तविक ठेकेदाराने स्वत: बस खरेदीची ५० टक्के रक्कम उभारणे आवश्यक असताना ती रक्कम देखील त्याने कर्ज उभारुन भरली. कॅस्ट्रल सोबत १० वर्षांचा करार असला तरी परिवहन सेवा डबघाईला आल्याने आता पालिकेने नवीन बस स्वत: चालवण्यास घेतल्या. शिवाय कॅस्ट्रलने देखील गेल्या महिन्यापासूनच आपला पसारा आटोपला. सध्या ठेकेदार व महापालिकेत न्यायालयीन वाद रंगला आहे. यात ठेकेदाराने पालिकेडून ४० कोटी रुपयांची रक्कम येणे असल्याचा दावा केला आहे. तर पालिकेने ठेकेदाराकडूनच ४५ कोटी रुपये वसूल करायचे असल्याचा पावित्रा घेतलाय. पालिकेकडून ४२ कोटी रुपये येणे असल्याने ते मिळताच कर्जाची थकबाकी भरणार असल्याचे कॅस्ट्रलचे राजा गेमनानी यांनी बँकेस कळवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mira-Bhyander's Transportation Service, Panchktra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.