मीरारोड : माशाचा पाडा येथील २७ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:37 PM2021-06-10T18:37:14+5:302021-06-10T18:38:23+5:30
उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई.
मीरारोड : महापौरांच्या प्रभागातील माशाचा पाडा येथे महापालिकेच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी अनाधिकृत खोल्या बांधून अतिक्रमण केले होते. त्या २७ बेकायदेशीर बांधकामांवर उपायुक्त अजित मुठे यांचे नेतृत्वाखाली बुलडोझर फिरवण्यात आता.
महापौर ज्योत्स्ना हसनाळे तसेच अन्य तीन भाजपा नगरसेवकांचा हा प्रभाग असून या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. या बेकायदेशीर बांधकामांच्या साम्राज्यामुळे मोठी झोपडपट्टी आकाराला आली आहे. इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र, नाविकास क्षेत्र, नैसर्गिक ओढे तसेच आदिवासी आणि पालिका आरक्षणाच्या जमिनी असून देखील बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. या बेकायदेशीर बांधकामना संरक्षण दिले जातेच शिवाय सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत.
या भागातील आरक्षणात नव्याने १९ खोल्या आणि ८ दुकाने अशी बेकायदा बांधकामे होत असल्याची तसेच स्थानिक प्रभाग अधीकारी कारवाई करत नसल्याची तक्रार उपायुक्त अजित मुठे यांना मिळाली. त्यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्या निदर्शनास सदर प्रकार आणून दिला. आयुक्तांच्या आदेशानंतर मुठे यांनी बुधवारी पालिका अधिकारी - कर्मचारीसह पोलीस आदींच्या बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने सदर २७ बेकायदा बांधकामे पाडून टाकली. मुठे यांनी बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यास दिले आहेत . या भागातील मोठ्या प्रमाणात झालेली सर्व अनधिकृत बांधकामे मोठी मोहीम राबवून पाडून टाकण्याची मागणी होत आहे.