मीरा रोड : साडेतीन महिन्यांनंतर पालिकेने दिली मैदानातील बेकायदा प्रवेश व चित्रिकरणाची पोलिसात फिर्याद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 07:19 PM2018-02-10T19:19:21+5:302018-02-10T19:20:16+5:30
महापालिकेच्या मैदानात बेकायदा प्रवेश करुन चित्रिकरण केल्याप्रकरणी तब्बल साडे तीन महिन्यांनी पालिकेने सबंधित टेलटेल मीडियाच्या प्रतिनिधीविरोधात फिर्याद दिल्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय
मीरारोड - महापालिकेच्या मैदानात बेकायदा प्रवेश करुन चित्रिकरण केल्याप्रकरणी तब्बल साडे तीन महिन्यांनी पालिकेने सबंधित टेलटेल मीडियाच्या प्रतिनिधीविरोधात फिर्याद दिल्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीरा रोडच्या नया नगर परिसरात आला हजरत खाँ नावाने पालिकेचे क्रीडा मैदान आहे. २३ आॅक्टोबर २०१७ रोजी सदर मैदानात कुठल्या तरी मालिकेसाठी चित्रिकरण सुरु असल्याची तक्रार तत्कालिन प्रभाग अधिकारी जगदिश भोपतराव यांना मिळाली होती. त्या नुसार भोपतराव यांनी कनिष्ठ अभियंता सचिन पवार व अन्य कर्मचारयांना मैदानात पाहणी साठी पाठवले.
पवार व कर्मचारी मैदानात गेले असता तेथे चित्रीकरण सुरु असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी असलेल्या टेलटेल मीडियाचे प्रतिनिधी यांनी सुरुवातीला आपणाकडे परवानी असल्याचे सांगितले. पण चित्रिकरण आटोपून कदम हे निघून जात असताना पवार यांनी पुन्हा रोखत मैदानाचे चित्रिकरणासाठीचे एक एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या मैदानाचे भाडे 1 लाख रुपये असल्याने ते भरण्यास सांगितले. कदम यांनी कार्यालयात येऊन भरतो असे सांगितले पण ते भरले मात्र नाही.
विना परवानगी पालिका मैदानात चित्रिकरण केल्याने चित्रिकरण शुल्क पोटीचे १ लाख व शुल्क न भरल्याने दहा पट दंड या नुसार एकूण ११ लाख रुपये पालिकेचा महसुल बुडवल्याचा ठपका पालिकेने आता नया नगर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत ठेवलाय. या शिवाय पालिकेची परवानगी न घेता इत्तर वापराकरीता पालिका मालमत्तेत प्रवेश केल्याने ट्रेसपासिंगचा गुन्हा प्रविण कदम विरोधात दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक आॅक्टोबरमध्ये तक्रार होऊन देखील पालिकेने वेळीच गुन्हा दाखल केला नाही तसेच चित्रिकरणापोटीचे शुल्क देखील वसुल केले नाही. नुकतेच भार्इंदर पश्चिम येथे आमदार नरेंद्र मेहता यांच्या तक्रारी नंतर पालिकेने चित्रीकरणाप्रकरणी दंडा सह ५ लाख रुपये वसुल केलेच शिवाय मनोज घोन्सालवीस विरुद्ध भार्इंदर पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला होता. भार्इंदर येथील घटने नंतर आपण आमदार मेहतांना नया नगर मधील आला हजरत खाँ मैदानात झालेल्या बेकायदा चित्रिकरणाबद्दल कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले असे रमझान खत्री म्हणाले. त्या नंतर सदर प्रकरणाची सूत्रं हलू लागली व पालिकेने गुन्हा दाखल केल्याची माहिती खत्री यांनी दिली आहे.