मीरा रोडला बिल्डरकडून ५० कोटींची फसवणूक, दोघांना अटक, तिसरा फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:46 AM2017-10-24T03:46:01+5:302017-10-24T03:46:03+5:30
मीरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्यामागील तन्वी इमिनन्स या बहुमजली बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा भागीदार विकासकांना अटक केली
मीरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्यामागील तन्वी इमिनन्स या बहुमजली बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा भागीदार विकासकांना अटक केली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरु आहे. या फसवणुकीचा आकडा तब्बल ५० कोटींच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काशिमीरा पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात घरे खेरदी करणाºयांना ताबा न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तन्वी प्रकल्पाचे भागीदार संगीता विजय हेगडे, दयाभाई सुतारिया व भूपतभाई राजीवभाई लुखी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. खरेदीदारांच्या फसवणुकीची रक्कम कोटींमध्ये असल्याने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
गुन्हे शाखेने या प्रकरणी भूपतभाई लुखी याला आधी अटक केली होती. तर रविवारी रात्री संगीता विजय हेगडे (४१) हिला अटक करण्यात आली आहे. हेगडेला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तिसरा आरोपी दयाभाई सुतारियाचा शोध सुरु आहे.
तन्वी ग्रूपने बहुमजली तन्वी इमिनेन्स या नावाने वसाहत बांधण्यास घेत २०१० पासून सदनिकांची नोंदणी सुरु केली होती. यात फेज एकच्या इमारतीला दहा मजली, तर फेज दोनच्या इमारतीस पालिकेकडून पाच मजल्यांचीच परवानगी असताना विकासकांनी मात्र सुरूवातीला फेज एकची इमारत १८ मजली, तर फेज दोनची इमारत १४ मजली असल्याचे सांगून घरे विकण्यास सुरुवात केली होती.
बिल्डरने आतापर्यंत ५० हजार रुपयांपासून ४० ते ५० लाख रुपयांची रक्कम ग्राहकांकडून घेतली आहे. करारनामा झाल्यावर तीन वर्षात घराचा ताबा देण्याचे आश्वासनही बिल्डरने पाळले नाही.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून काम बंदच आहे. टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने काही खरेदीदारांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
>दीड वर्षे थांबले होते प्रकल्पाचे काम
या प्रकल्पाचे काम गेली सात वर्षे मार्गी लागलेले नव्हते. त्यातही गेल्या वर्ष-दीड वर्षात ते जवळपास ठप्प होते. ते का मार्गी लागत नाही, याबबात वावंरवार विचारणा केल्यावरही घरे घेणाºयांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.
आतापर्यंत दोन विकासकांना अटक केली आहे. सुमारे ५० लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून फसवणुकीची रक्कम १५ कोटींच्या घरात आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत असुन ही रक्कम सुमारे ५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
- व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा