बंदोबस्तासाठी असलेल्या महिला व पुरुष पोलीसांना आवश्यक साहित्यांचे किट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:20 PM2019-04-25T16:20:41+5:302019-04-25T16:21:33+5:30
ठाणे लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील पोलीस कर्मचारायांना मतदानाच्या आदल्या दिवसापासुन बंदोबस्त लागणार आहे.
मीरारोड - ठाणे लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील पोलीस कर्मचारायांना मतदानाच्या आदल्या दिवसापासुन बंदोबस्त लागणार आहे. अशा पोलीस कर्मचारायांसाठी साबण, पेस्ट , बिस्कीट आदी आवश्यक साहित्याचे किट दिले जाणार आहे. बंदोबस्ता वरील पोलीसांची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्यांदाच जिल्ह्यात असे साहित्य दिले जात आहे. महिला व पुरुष पोलीसांसाठी वेगवेगळं किट तयार करण्यात आली आहेत.
मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. रात्रभर मतदान केंद्रावर बंदोबस्त केल्या नंतर मतदाना दिवशी सुध्दा त्याच पोलीसांना उभे रहावे लागते. अगदी रात्री इव्हीएम यंत्र पेट्यां मध्ये सीलबंद करुन कडेकोट जागी ठेवे पर्यंत पोलीसांना जाता येत नाही. जवळपास चाळीस तास सलग ड्युटी करावी लागते. मतदानाच्या दिवशी लवकर उठुन आंघोळ आदी करण्यासाठी सुध्दा मतदान केंद्रातच थांबावे लागते. बंदोबस्तसाठी केलेल्या नेमणुकीच्या जागे वरुन हलता येत नाही.
यंदा मात्र ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीर राठोड यांनी पोलीस कर्मचारायांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक साहित्याचे किट बंदोबस्ता वरील पोलीसांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीसांनी सुमारे ३ हजार किट तयार केले आहेत. यात पुरुष आणि महिला पोलीसांसाठी वेगवेगळे किट आहेत. पुरुषांच्या किट मध्ये ९ तर महिलांच्या किट मध्ये त्याांना आवश्यक असलेल्या १२ वस्तुंचा समावेश आहे. आंघोळीचा साबण, पेस्ट, ब्रश, डोक्याचे तेल, बिस्कीट पुडा, गरमीच्या अनुषंगाने ग्लुकोज पावडर आदी वस्तुंचा किट मध्ये समावेश आहे.
ठाणे ग्रामीण पोलीसांचे सुमारे अडिज हजार पोलीस कर्मचारायांसह अन्य जिल्ह्यातुन येणारे पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक आदी पाचशे पोलीसांसाठी किट तयार करण्यात आले आहे. किट वर डॉ. राठोड यांच्या कडुन निवडणुक बंदोबस्ता साठी असलेल्या पोलीस कर्मचारायांना शुभेच्छा अशा प्रकारचे स्टीकर लावण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण पोलीसां कडुन पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला असुन याचा खर्च पोलीस कल्याण निधी मधुन केला जाणार आहे. या आधी सांगल जिल्ह्यात अशा प्रकारे किट देण्यात आली होती.
पोलिसांकडे आवश्यक त्या सर्व वस्तू किट मुळे त्यांच्या जवळ राहणार आहेत. त्यामुळे बंदोबस्त सोडून अन्यत्र जाणे किंवा अन्य कोणा कडुन वस्तु मागण्याची गरज पडणार नाही. शिवाय गरजेच्या वस्तु एकाच किट मधुन खात्याकडून दिल्याने सुखद अनुभव मिळणार आहे असे सूत्रांनी सांगितले.