Mira Road: मल्टिस्पेशालिटी कॅशलेस सरकारी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया होणार मोफत
By धीरज परब | Published: December 6, 2023 01:06 PM2023-12-06T13:06:41+5:302023-12-06T13:07:13+5:30
Mira Road News: आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून मीरा भाईंदर मध्ये पहिले सुपर स्पेशालिटी १०० खाटांचे रुग्णालय नवीन वर्षात सुरु होणार आहे .
मीरारोड - आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून मीरा भाईंदर मध्ये पहिले सुपर स्पेशालिटी १०० खाटांचे रुग्णालय नवीन वर्षात सुरु होणार आहे . राज्य सरकारच्या ' महात्मा फुले जन आरोग्य योजना' अंतर्गत कर्करोगासह सर्व उपचार, तसेच अँजिओप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे आणि पेसमेकर अशा अनेक मोठ्या सर्जरी व त्यावरील उपचार सरकारी योजनेतून मोफत होणार असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मतिथी दिनी २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन असल्याची माहिती आ. सरनाईक यांनी दिली.
काशीमीरा महामार्गावरील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाजवळ ही तीन मजली रुग्णालय इमारत कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यात बांधून महापालिकेला मिळाली आहे. सध्या त्यावर चौथा मजला बांधण्याचे ठरवण्यात आले आहे . रुग्णालय इमारत व रुग्णालय सुरु करण्यासाठीचा आढावा या बद्दलची बैठक महापालिकेत आ . प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त संजय काटकर व संबंधित पालिका अधिकारी यांच्यात मंगळवारी झाली.
रुग्णालय इमारतीचे ९० टक्के काम झाले असून १५ जानेवारीपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे बैठकीत ठरले. ‘मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालय' असे नामकरण ह्या रुग्णालयाचे करण्यात आले आहे . इमारतीत सर्व आधुनिक मशिनरी व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी २५ कोटी विशेष निधी मंजूर करून आणला आहे. त्यात महापालिकेचा निधी खर्च झालेला नाही.
या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे व्यवस्थापन महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. डॉक्टर , कर्मचारी आदी नियुक्ती सर्व संस्था करणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी व उपचार सरकारच्या माध्यमातून मोफत होणार आहेत. गरजूंना औषधेही मोफत मिळणार आहेत.
वैद्यकीय उपकरणे , यंत्रणा व साहित्य अश्या १ हजार ७८ वस्तू खरेदीसाठी सरकारने २५ कोटीच्या निधी दिल्याने त्यातूनच पालिकेने निविदा काढली आहे. पहिल्या टप्प्यात १९ कोटी ६६ लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले जाणार असल्याची माहिती बैठकीत प्रशासनाने दिली.
मीरा भाईंदरच्या नागरिकांना गंभीर आजार व तातडीचे उपचार , शस्त्रक्रिया आदी वैद्यकीय सुविधा शासन योजनेतून मोफत मिळाव्यात ह्यासाठी कॅशलेस रुग्णालय निर्माण व्हावे यासाठी आपण प्रयत्न करत होतो . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटींचा निधी दिल्याने गरीब, गरजू रुग्णांना संजीवनी देणारे हे रुग्णालय नवीन वर्षात नागरिकांना जीवनावश्यक अशी भेट ठरणार आहे असे आ. सरनाईक यांनी सांगितले.
ह्या सुविधा मिळणार रुग्णालयात
- आयसीयू, पोस्ट ऑपरेटिव्ह आयसीयू, एसी जनरल बेड आणि कॅज्युअल्टी बेडसह १०० खाटा असतील.
- पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी ओपीडी, रक्त तपासणी हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री टेस्ट, ईसीजी, सोनोग्राफी, २डी इको टेस्ट, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, केयूव्ही, सीटी स्कॅन स्क्रीनिंग मोफत होईल.
- अॅपेन्डेक्टॉमी, हर्निया, कोलेसिस्टेक्टोमी, मूळव्याध, फिस्टुला आणि इतर लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या जातील.
- ऑर्थो शस्त्रक्रिया जसे की फ्रॅक्चर, आर्थ्रोस्कोपी, सांधे बदलणे येथे होतील.
- कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी जसे की अँजिओप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे आणि पेसमेकर या सर्जरी व उपचार .
- यूरो शस्त्रक्रिया जसे की पीसीएनएल , युआरएसएल , नेफरेक्टोमी , न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी , स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की एलएव्हीएच , हिस्टेरेक्टॉमी , डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया .
- वैद्यकीय व्यवस्थापन जसे की क्रिटिकल केअर, आयसीयू थ्रोम्बोलिसिस, आयएबीपी दाखल करणे, विष प्रकरणे, साप चावणे यावरही उपचार होणार आहेत. रूग्णांसाठी वरील सर्व अंतर्गत सेवा देत असतानाच डिस्चार्ज झाल्यानंतर ड्रेसिंग, डॉक्टरांचा सल्ला आणि निदानासह उपचार मोफत केले जातील.