Mira Road: फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने केली ६० लाख ८१ हजारांना फसवणूक
By धीरज परब | Published: March 15, 2024 08:42 PM2024-03-15T20:42:22+5:302024-03-15T20:42:42+5:30
Mira Road News: एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीतील मॅनेजरने तारण सोने लिलावात मिळवून देतो व ते खुल्या बाजारात विकून चांगला नफा कमवून देण्याचे आमिष दाखवत एका कार डिलरची ६० लाख ८१ हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे.
मीरारोड - एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीतील मॅनेजरने तारण सोने लिलावात मिळवून देतो व ते खुल्या बाजारात विकून चांगला नफा कमवून देण्याचे आमिष दाखवत एका कार डिलरची ६० लाख ८१ हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे.
मीरारोडच्या सिल्वर पार्क जवळील आशादीप इमारतीत फेडबँक फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडची शाखा आहे. त्या ठिकाणी गिरीजाशंकर सतीश तिवारी रा. चामुंडा क्लासिक, डेल्टा गार्डन जवळ, मीरारोड हा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तिवारी याची ओळख जवळच संघवी नगर मध्ये राहणाऱ्या कार डीलर अमित जयस्वाल ( २५) याच्याशी झाली होती.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तिवारी याने फायनान्स कंपनीच्या मीरारोड कार्यालयातील व्यवस्थापक म्हणून काम करत असताना जयस्वाल ह्याला सांगितले कि , फेडबँक फायनान्शियल सर्व्हिस ह्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीमध्ये जे ग्राहक गोल्ड लोन घेतात व घेतलेले कर्ज फेडू शकत नाही अशा विरोधात कंपनीच्या नियमानुसार कारवाई करून त्यांनी तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव केला जातो.
असे तारण ठेवलेले सोने लिलावात मिळवून देतो. लिलावातील सोने विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकून फायदा मिळवून देतो असे सांगितले . सुरुवातीला जयस्वाल कडून पैसे घेऊन सोने लिलावात घेऊन त्यांना काही फायदा तिवारी याने करून दिला. त्यामुळे जयस्वाल यांचा तिवारीवर विश्वास बसला होता. त्यानंतर तिवारी याने गोल्ड लोन मधील तारण सोने तो काम करत असलेल्या फायनान्स कंपनी कडून खरेदी करायचे सांगून वेळोवेळी पैसे घेतले . अश्या प्रकारे एकूण ६० लाख ८१ हजार रुपये तिवारी याने जयस्वाल कडून उकळले. नंतर नफा देण्याचे तर सोडाच पण मुद्दल देखील न देता तिवारी हा कंपनीतील नोकरी सोडून तसेच मीरारोड येथील घर सोडून पळून गेला . त्याचा मोबाईल देखील बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जयस्वाल यांनी तिवारी विरुद्ध फिर्याद दिली. गुरुवारी काशीमीरा पोलिसांनी तिवारीवर गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे हे तपास करत आहेत.