Mira Road: क्रिप्टोत फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिल्या बद्दल देश भरतील तपासी यंत्रणांनी घेतले धडे
By धीरज परब | Published: July 9, 2023 09:12 AM2023-07-09T09:12:14+5:302023-07-09T09:12:37+5:30
Police: मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेने क्रिप्टोकरन्सी मध्ये झालेली फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिल्या बद्दल केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशा वरून देशभरातील विविध तपास यंत्रणांच्या सुमारे ३०० अधिकाऱ्यांनी ह्या यशस्वी तपासाचे धडे ऑनलाईन कार्यशाळे द्वारे घेतले .
- धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेने क्रिप्टोकरन्सी मध्ये झालेली फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिल्या बद्दल केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशा वरून देशभरातील विविध तपास यंत्रणांच्या सुमारे ३०० अधिकाऱ्यांनी ह्या यशस्वी तपासाचे धडे ऑनलाईन कार्यशाळे द्वारे घेतले . बनावट लिंकच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी मध्ये झालेल्या फसवणुकीची रक्कम परदेशी वॉलेट मधून परत मिळवून देणारी हि देशातील पहिलीच घटना मानली जात असल्याने केंद्रीय गृहखात्याने याची दखल घेतली.
मीरारोडच्या जेपी नॉर्थ मध्ये राहणाऱ्या योगेश जैन यांना हॉंगकॉंगच्या दोघा मोबाईल धारकांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये बीटीसी इंडिया व्हॉट्सअप ग्रुप द्वारे बिट कॉईन ट्रेडिंग बद्दल टिप्स देऊन जास्त नफा कमवण्याचे आमिष दाखवले . जैन यांनी बिनान्स ऍप वरून ३३ लाख ६५ हजार खर्च करून ३९ हजार ५९६ यूएसडीटी खरेदी केले व त्यांच्या सांगण्यानुसार अनोळखी लिंक द्वारे बीटीसी कॉईन ट्रेडिंग ऍप मध्ये भरले . नंतर तो ऍप व ॲमीचा नंबर बंद झाला.
जैन यांनी क्रिप्टो हेल्पलाईन ह्या अमेरिकन न्यूयॉर्क बेस कंपनी ची मदत घेत पैश्यांचे कोणकोणत्या ऍप व वॉलेट मध्ये हस्तांतरण झाल्याचा सविस्तर अहवाल काढला . मे २०२२ मध्ये जैन यांनी सायबर शाखेला तक्रार केल्यावर पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर , सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ , उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर , अंमलदार प्रवीण आव्हाड यांनी त्या अहवालाच्या आधारे तपास सुरु केला . बिनान्स व गेटआयओ ह्या क्रिप्टो प्लॅटफॉर्म कडून सहकार्य मिळाले नाही.
परंतु त्या अमेरिकन कंपनीच्या अहवाला नुसार जैन यांचे पैसे ओकेएक्स कडे गेले असल्याने सायबर शाखेने मे २०२२ मध्ये त्यांच्याशी देखील संपर्क केला . सुरवातीला त्यांनी काही प्रतिसाद दिल नाही मात्र दुसऱ्यांदा त्या कंपनीने प्रतिसाद देत ज्या चायनीज व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले होते त्याची माहिती दिली . ते पैसे गोठवल्याचे तसेच न्यायालयाचे आदेश ठराविक दिवसात सादर केल्यास पैसे परत करण्याची तयारी दर्शवली . विशेष म्हणजे ओकेएक्स ने त्या अमेरिकन कंपनीचा ट्रेस अहवाल मान्य केला . सायबर शाखेने ओकेएक्स ला विनंती करून न्यायालयीन आदेशा साठीची मुदत वाढवून घेतली.
मार्च २०२३ मध्ये काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर जैन यांनीच ठाणे न्यायालयात काशीमीरा पोलीस , सायबर सेल व ओकेएक्स विरुद्ध पैसे परत मिळण्यासाठी याचिका केली . न्यायालयाने आदेश दिल्यावर सायबर सेल ने ओकेएक्स शी संपर्क साधला . त्या नंतर जून मध्ये जैन यांच्या खात्यात त्यांचे फसवणूक झालेले ३६ लाख रुपये परत मिळाले.
या तपासाची दखल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर ने घेतली. त्यांच्या निर्देश नुसार शुक्रवार ७ जुलै रोजी सायंकाळी देशातील सायबर सेल व पोलिसांसह तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसाठी तासाभराची मार्गदर्शनपर ऑनलाईन कार्यशाळा पार पडली . या कार्यशाळेत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय निरीक्षक गुंजकर यांनी मार्गदर्शन केले.
गुन्ह्याचा घडलेल्या घटने पासून कश्या पद्धतीने तपास केला , कसे पत्रव्यवहार केले , न्यायालयाचे आदेश मिळवण्यासाठी फिर्यादी याला मार्गदर्शन केले आदी बाबतची माहिती सायबर सेलने सहभागी अधिकाऱ्यांना दिली. तपासात काय अडचणी आल्या , क्रिप्टो वॉलेट धारकांचे प्रत्यक्षात नसलेले पत्ते , त्यातच फसवणूक करणाऱ्या टोळ्या ह्या परदेशात असल्याने आपल्या देशातील कायदे नियम व न्यायालयाचे आदेश लागू होण्यात येणाऱ्या अडचणी आदींवर सुद्धा उहापोह झाला.
मुळात देशातील कायदे - नियमांच्या व प्राधिकरणांच्या अख्त्यारी बाहेर असलेल्या अश्या अविश्वासू माध्यमातून गुंतवणूक वा ट्रेंडिंग नागरिकांनी टाळावी , त्यात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे . कारण योगेश जैन यांच्या प्रमाणेच फसवणूक झालेल्या प्रत्येकास पैसे परत मिळतीलच अशी शाश्वती नसल्याचे जाणकारांनी सांगितले.