Mira Road: मीरारोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अखेर नवीन तिकीट खिडक्या सुरू
By धीरज परब | Published: February 12, 2023 02:25 PM2023-02-12T14:25:50+5:302023-02-12T14:26:19+5:30
Mira Road: गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या ह्या तिकीट खिडकीचे काम विचारे यांनी पाठपुरावा करून पूर्ण करून घेत शनिवारी सायंकाळी त्याचे उदघाटन केले .
मीरारोड - प्रवाश्यांची प्रचंड गर्दी असून देखील नियोजन अभावी प्रवाश्याना मीरारोड रेल्वेस्थानकातील जिन्यावर जाऊन तिकीट काढावी लागत होती . गेल्या अनेक वर्षां पासूनचा प्रवाश्यांचा हा जाच आता रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तिकीट खिडक्या सुरु केल्याने संपुष्टात आला आहे.
मीरारोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण मीरा भाईंदर महापालिकेने करताना खाली तिकीट खिडक्यांसाठी आवश्यक जागा व सोयी सुविधा मात्र केली नव्हती . त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जागे अभावी रेल्वे पादचारी पुलावरच तिकीट खिडकी बांधून वापर सुरु केला होता . त्यामुळे प्रवाश्याना तिकीट काढण्यासाठी पादचारी पुलावर जावे लागत असे . तिकीट काढल्यावर मग फलाटावर उतरावे लागत असे . ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना तर तिकिटासाठी खूपच मनस्ताप सहन करावा लागत होता. शिवाय तिकीट व पास साठी रांगा लागत असल्याने पादचारी पुलावर गर्दी होत होती.
खासदार राजन विचारे यांनी प्रवाश्यांचा होणारा त्रास दूर करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेम्बर मध्ये पश्चिम रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक सत्यकुमार, महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांच्या सोबत पाहणी केली होती . तेव्हा सदर बंद तिकीट खिडकी सुरु करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह सह काही आवश्यक कामे करून देण्याचे निर्देश खा . विचारे यांनी पालिका आयुक्तांना दिले होते . आयुक्तांनी बांधकाम विभागास अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सांगितल्या नंतर ती कामे बांधकाम विभागाने करून दिली.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या ह्या तिकीट खिडकीचे काम खा . विचारे यांनी पाठपुरावा करून पूर्ण करून घेत शनिवारी सायंकाळी त्याचे उदघाटन केले . तिकीट खिडकीच्या लोकार्पणासाठी खा. विचारे सह ,पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रबंधक नीरज वर्मा, सीनियर डीसीएम अशोक मिश्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश तांडेल सह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, धनेश पाटील,प्रवक्ते शैलेश पांडे, माजी नगरसेवक स्नेहा पांडे व प्रवीण पाटील, शहर संघटक सुप्रिया घोसाळकर, तेजस्वी पाटील,शहर प्रमुख जितेंद्र पाठक, सदानंद घोसाळकर, अस्तिक म्हात्रे आदी उपस्थित होते