मिरारोड : मुख्य रस्त्यालगतच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवून पार्किंगसाठी वापर करण्यास टाळाटाळ
By धीरज परब | Published: January 14, 2023 05:17 PM2023-01-14T17:17:07+5:302023-01-14T17:17:31+5:30
काशीमीरा नाका ते भाईंदर फाटक पर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा शहराचा मुख्य रस्ता आहे.
मीरारोड - शहराच्या मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंगची जागा नाही. दरम्यान, बेकायदा रस्त्यावर होणारी पार्किंग समस्या सोडवण्यासाठी गौरव गार्डन कॉम्प्लेक्स समोर असलेली सरकारी जागा पार्किंग सुविधेसाठी घेण्यास महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी कमालीची टाळाटाळ चालवली आहे.
काशीमीरा नाका ते भाईंदर फाटक पर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा शहराचा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्यावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ असते जेणेकरून वाहन कोंडी पाचवीला पुजलेली आहे. त्यातच मेट्रोचे काम सुरू झाल्या पासून रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. तर ह्या मुख्य रस्त्यावर नो पार्किंग असून देखील दोन्ही बाजूला बेकायदेशीर वाहन पार्किंग केली जात असल्याने समस्या आणखी गंभीर बनली आहे.
ह्याच मुख्य रस्त्यावर असलेल्या तुंगा रुग्णालय, गौरव गार्डन कॉम्प्लेक्स व जे बी डेकोर आदी बांधकामांच्या समोरची असलेली मोकळी जागा ही सरकारी आहे . सदर सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचा वाणिज्य वा अन्य फायद्या साठी बेकायदेशीर वापर केला जात आहे. तसे असताना ह्या जागेवरील अतिक्रमण महापालिका जाणीवपूर्वक हटवत नाही. तर महसूल विभागाने देखील अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले नाहीत.
सदर जागा बहुतांश मोकळी असून त्याठिकाणी वाहनतळ उभारल्यास मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होऊन रस्त्यावर होणारी बेकायदा पार्किंग थांबू शकते. नागरिकांची मोठी सोय होणार आहे. शिवाय पालिकेला उत्पन्न देखील मिळू शकते. मात्र महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मात्र सदर जागा वाहनतळ साठी वापरात आणण्यास कमालीची टाळाटाळ चालवली आहे. एरव्ही नागरी सुविधां साठी जागा नसल्याची ओरड करणारे देखील सरकारी जागा असून सुद्धा चिडीचुप आहेत.
नंदकिशोर देशमुख ( अपर तहसीलदार, मीरा भाईंदर ) - महापालिकेने सदर सरकारी जमीन वाहनतळ साठी मागितल्यास तसा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवता येईल. परंतु पालिकेने अजून तरी तशी मागणी केलेली नाही.