Mira Road: रिक्षावाल्यांच्या मनमानीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बससेवा सुरू करा, रहिवाश्यांची मागणी
By धीरज परब | Published: May 5, 2024 12:02 PM2024-05-05T12:02:31+5:302024-05-05T12:03:04+5:30
Mira Road News: मुंबई अहमदाबाद महार्गावर वाढती गृहसंकुले पाहता मीरारोड रेल्वे स्थानक ते आराध्य हायपार्क व मीरारोड स्थानक ते ठाणे व्हाया आराध्य हायपार्क अशी बससेवा सुरु करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी मीरा भाईंदर महापालिके कडे केली आहे .
मीरारोड - मुंबई अहमदाबाद महार्गावर वाढती गृहसंकुले पाहता मीरारोड रेल्वे स्थानक ते आराध्य हायपार्क व मीरारोड स्थानक ते ठाणे व्हाया आराध्य हायपार्क अशी बससेवा सुरु करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी मीरा भाईंदर महापालिकेकडे केली आहे . रिक्षा चालकांच्या मनमानी व अवास्तव भाडे मागणीच्या जाचातून सुटका करा असे रहिवाश्यांनी बोलून दाखवले.
काशीमीरा येथील ठाकूर मॉल मागे असलेल्या आराध्या हायपार्क ह्या गृहसंकुलातील प्रमोद पाटील , आशिष सावंत , सोनाली मोहिते , मंगेश कांबळे , संजीव गुप्ता , पदमचंद शर्मा , टी सुंदरन आदी रहिवाश्यांच्या शिष्टमंडळाने मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे व उपसचिव आणि परिवहन उपक्रम अधिकारी दिनेश कानुगडे यांना भेटून निवेदन दिले.
आराध्य हायपार्क गृहसंकुलातील रहिवासी तसेच स्वयंसेवी समन्वय समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात सदर संकुलात १२०० सदनिका असून सुमारे तीन ते साडेतीन हजार रहिवाशी राहतात . या शिवाय डीबी रियालिटी , मन आदी संकुलात व परिसरात मिळून एकूण १२ ते १४ हजार लोकवस्ती आहे . शिवाय येथे लता मंगेशकर नाट्यगृह, ठाकूर मॉल , शाळा आदी आस्थापना आहेत . नव्याने येथे अनेक इमारती उभ्या रहात आहेत .
येथील रहिवाश्याना मीरारोड रेल्वे स्थानक जवळचे पडत असून रोज सुमारे २५०० ते ३००० प्रवासी या ये जा करीत आहेत. शिवाय बाजार, शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकुल, वाणिज्य परिसर मीरारोड येथे असून स्थानिक जनतेला रिक्षा प्रवासावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु रिक्षा चालकांच्या मनमानी व्यवहारामुळे प्रवासी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ह्या परिसरासाठी मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन बस सेवा सुरु करून रहिवाश्याना सुविधा देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे .