Mira Road: मेट्रो मार्गिकेखालच्या मीरारोड येथील उड्डाणपुलाचे ह्याच महिन्यात होणार लोकार्पण, दोन्ही आमदारांनी केली पुलाची पाहणी
By धीरज परब | Published: July 16, 2024 07:10 PM2024-07-16T19:10:18+5:302024-07-16T19:10:50+5:30
Mira Road News: मीरा भाईंदर मेट्रो मार्गिके खालून जाणाऱ्या मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क ते सिल्वर पार्क उड्डाणपुलाचे ह्याच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वा त्यांच्या मान्यतेने लोकार्पण केले जाणार आहे . त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक कोंडीतुन नागरिकांना दिलासा मिळणार आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर मेट्रो मार्गिके खालून जाणाऱ्या मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क ते सिल्वर पार्क उड्डाणपुलाचे ह्याच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वा त्यांच्या मान्यतेने लोकार्पण केले जाणार आहे . त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक कोंडीतुन नागरिकांना दिलासा मिळणार आहे . एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोच्या खालून उड्डाणपूल आणि त्या खालून रस्ता अर्थात डबलडेकर पूल पहिल्यांदाच बांधला गेल्याची माहिती यावेळी आमदार प्रताप सरनाईक सह आमदार गीता जैन यांनी दिली .
मीरा भाईंदर शहराच्या मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून मेट्रोच्या कामा मुळे रस्त्याची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी होत आहे . मेट्रो मार्गिके खालीच ह्या मार्गावरील प्रमुख वाहतूक कोंडी होणाऱ्या जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी सातत्याने चालवली होती .
छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील प्लेझेंट पार्क ते सिल्वर पार्क सिग्नल ह्या मेट्रो खालच्या नवीन उड्डाण पुलाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्याच्या कामाची पाहणी मंगळवारी आ . सरनाईक व आ . जैन यांनी केली . यावेळी एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, जे कुमार ईन्फ्राचे प्रोजेक्ट व्यवस्थापक सुब्रतोदास अधिकारी तसेच एमएमआरडीए व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पुलाच्या डिव्हायडर , रिफ्लेक्टर , रंगकाम अशी काही कामे आठवडाभरात पूर्ण होणार आहेत . पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून नागरिकां साठी ह्याच महिन्यात तो खुला केला जाणार आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण व्हावे अशी विनंती करून त्यांचा वेळ मागितला आहे . किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने स्थानिक खासदार , आमदार यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत उड्डाणपुल खुला केला जाईल असे दोन्ही आमदार यांनी सांगितले . उडाणपुलाच्या कामाचा आढावा घेत यांनी अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या .
मेट्रो साठी आपण सातत्याने पाठपुरावा , विधिमंडळात मुद्दा उपस्थित करत मेट्रो मंजूर करून आणली . मात्र मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची मोठी वर्दळ पाहता २०२० साली त्यावेळच्या एमएमआरडीएच्या अतिरिक्तआयुक्त सोनिया सेठी यांच्यासह प्रत्यक्ष प्रमुख नाक्यांच्या जंक्शनच्या ठिकाणी पाहणी करून उड्डाणपुलाची आवश्यकता आपण निदर्शनास आणून दिली होती . नंतर एमएमआरडीए कडून खाली मुख्य रस्ता आणि वर मेट्रो मार्गिकेच्या मध्ये डबलडेकर असे ३ उड्डाणपूल मंजूर केले . त्यासाठी २१७ कोटींचा निधी मंजूर केला गेला व त्यानुसार उड्डाणपुलाची कामे होत असल्याचे आ. सरनाईक यांनी सांगितले .
एमएमआरडीए क्षेत्रातील वरून मेट्रो व खालून उड्डाणपूल असा हा पहिला इंट्रीग्रेटेड पूल १ किलोमीटर लांबीचा आहे. पुलाची १७.५ मीटर रुंदी तर रॅम्पची रुंदी १९. ५ मीटर इतकी आहे. या उड्डाणपुलास लाल रंगाची थीम येथे ठरविण्यात आली आहे. या उड्डाणपुलासाठी जवळपास ७५ कोटींचा खर्च झाला आहे. ह्या उड्डाणपुलामुळे २ मोठ्या नाक्यांचा अडसर दूर होऊन वाहतूक कोंडी सुटणार आहे .