Mira Road: २० वर्षांपासून ज्याला मदत केली त्यानेच माजी नगरसेवकाच्या घरावर मारला ७५ लाखांचा डल्ला
By धीरज परब | Published: April 26, 2023 11:23 AM2023-04-26T11:23:55+5:302023-04-26T11:24:24+5:30
Mira Road News: सुमारे २० वर्षांपासून ज्याच्या साठी सर्वती मदत केली त्यानेच विश्वासघात करत माजी नगरसेवकाच्या घरातून तब्बल ७४ लाख ५० हजारांची रोकड व १२ हजारांची सोन्याची रिंग व चांदीचे नाणे चोरले.
- धीरज परब
मीरारोड - सुमारे २० वर्षांपासून ज्याच्या साठी सर्वती मदत केली त्यानेच विश्वासघात करत माजी नगरसेवकाच्या घरातून तब्बल ७४ लाख ५० हजारांची रोकड व १२ हजारांची सोन्याची रिंग व चांदीचे नाणे चोरले. परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मंगळवारी अटक करत सर्व ऐवज हस्तगत केला आहे.
मीरारोडच्या शीतल नगर मध्ये राहणारे केबल - इंटरनेट व्यावसायिक तसेच माजी नगरसेवक असलेले राजीव मेहरा राहतात. कामा निमित्त बाहेर गेलेले मेहरा रात्री घरी परतले असता अज्ञात चोरटयाने घराच्या गच्चीचा दरवाजा कापून आत प्रवेश करत कपाटाचा दरवाजा कापुन लॉकरमध्ये ठेवलेली ७४ लाख ५० हजार रोख रोख व सोन्या- चांदीचे १२ हजाराचे दागिने चोरले. मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे सह राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, विजय गायकवाड, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, प्रशांत विसपुते, संतोष चव्हाण यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी संजीवकुमार सदानंद सिंह रा. शितलनगर, मीरारोड याला २५ एप्रिल रोजी अटक केली. पोलिसांनी त्याच्या कडून ७४ लाख ५० हजार रोख रक्कम व १२ हजारांचे सोन्याची बाली व चांदीचा कॉईन असा मुददेमाल हस्तगत केला आहे.
आरोपी सिंह हा सुमारे २० वर्षां पासून मेहरा यांच्या सोबत होता. त्याला रहायला घर मेहरा यांनी ते रहात असलेल्या इमारतीतच दिले आहे. घरखर्च सुद्धा मेहरा देत होते. आरोपीच्या कुटुंबातील एका आजारी व्यक्तीचा उपचार खर्च मेहरा हेच करत होते. तरी देखील विश्वासघात करून सिंह याने चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे चोरी केल्या नंतर देखील सिंह हा मेहरा सोबतच फिरत होता. पोलिस तपासात सुद्धा तो बरोबर असायचा. परंतु सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो घटने दरम्यान इमारतीच्या बाहेर जाताना आढळून आला नाही आणि पोलिसांनी चौकशी सुरू करत त्याला अटक केली.