Mira Road: रशियात नोकरी देतो सांगून दोघा भावांना फसवले
By धीरज परब | Published: October 19, 2023 06:24 PM2023-10-19T18:24:59+5:302023-10-19T18:25:31+5:30
Mira Road Crime News: रशिया मध्ये वेटर आणि हेल्परची नोकरी देतो सांगून दोघा भावांना ४ लाख ३० हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आरोपीने व्हिसा , विमान तिकीट सुद्धा बनावट बनवले होते.
मीरारोड - रशिया मध्ये वेटर आणि हेल्परची नोकरी देतो सांगून दोघा भावांना ४ लाख ३० हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आरोपीने व्हिसा , विमान तिकीट सुद्धा बनावट बनवले होते.
नवी मुंबई , बेलापूरच्या अक्रोली गावात राहणाऱ्या ओमप्रकाश गुप्ता (२८) आणि मावसभाऊ मनोजकुमार गुप्ता ( ३२) हे बिगारी काम करतात . ऑगस्ट २०२२ मध्ये ओमप्रकाश याला ऑनलाईन सर्च करताना रशियात वेटर , हेल्परची नोकरीची जाहिरात दिसली . त्यात व्हॉइस व्हिडीओ वर नोकरीसाठी येणार खर्च आदींचे दर पत्रक सांगितले होते . सव्वा दोन लाख प्रत्येकी खर्च दिला होता . त्या क्रमांकावर संपर्क केला असता संजय विश्वकर्मा याने सांगितल्या नुसार व्हिसा एक्स्पर्ट मॅन पावर रिक्वायरमेंट कंपनीच्या भाईंदरच्या गोडदेव , मीनाक्षी बिल्डिंग मधील पत्त्यावर दोघांनी पासपोर्ट पाठवले .
काही दिवसात विश्वकर्मा याने व्हॉट्सएप वर विमानाचे तिकीट , रशियाचा वर्क व्हिसा ओमप्रकाश ला पाठवले . दोघांनी विश्वकर्मा याला ४ लाख ३० हजार इतकी रक्कम भरली . रशियात नोकरी मिळाल्याच्या आनंदात दोघे व कुटुंबीय होते . विश्वकर्मा याने चेन्नई विमानतळावरून विमान असल्याचे सांगितल्याने दोघे विमान पकडण्यासाठी गेले असता त्यांचे तिकीट नकली असल्याचे तसेच रशियाचा व्हिसा बनावट असल्याचे आढळून आले . विश्वकर्माने त्याचा मोबाईल सुद्धा बंद केला . फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ओमप्रकाश याच्या फिर्यादी वरून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ निरिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे .