ओला आणि सुका कचरा वेगळा देण्यावर आता ॲपद्वारे लक्ष; २ लाख घरांवर क्युआर कोड लावल्याची मनपाची माहिती
By धीरज परब | Published: May 5, 2024 12:17 PM2024-05-05T12:17:39+5:302024-05-05T12:18:18+5:30
Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा ह्यासाठी शहरातील ५ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण सांस्थाच्या निवासी इमारतीतील सुमारे २ लाख घरांवर क्यूआर कोड लावला आहे . ओला व सुका कचरा वेगळा करून दिला असल्यास त्या क्यूआर कोड ला स्कॅन करून ॲप द्वारे तशी नोंद होत आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा ह्यासाठी शहरातील ५ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण सांस्थाच्या निवासी इमारतीतील सुमारे २ लाख घरांवर क्यूआर कोड लावला आहे . ओला व सुका कचरा वेगळा करून दिला असल्यास त्या क्यूआर कोड ला स्कॅन करून ॲप द्वारे तशी नोंद होत आहे . त्यामुळे कचरा वर्गीकरण करून न देणाऱ्यांची माहिती पालिकेला रोजच्या रोज समजणार आहे . टप्या टप्याने शहरातील सर्व निवासी व अनिवासी मालमत्तांवर सुद्धा क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.
घनकचरा हाताळणी व व्यवस्थापन नियम नुसार ओला व सुका कचरा हा वेगवेगळा करून देणे प्रत्येकाला कायद्याने बंधनकारक आहे . परंतु गेल्या अनेकवर्षां पासून महापालिका कचरा वर्गीकरण साठी ठोस कार्यवाही करत नसल्याने आजही बहुतांश लोक हे कचरा वर्गीकरण न करताच देत आहेत.
ओला व सुका कचरा वर्गीकरण साठी जनजागृतीवर पालिकेने लाखो रुपये खर्च केले . लोकांना कचरा उचलणार नाही पासून नळ जोडण्या खंडित करू , दंड आकारू असे इशारे दिले गेले . परंतु हे सर्व केवळ पोकळ दिखावा ठरल्याने आजही शहरात तब्बल ५० टक्के कचरा वर्गीकरण करून दिलाच जात नाही . त्यामुळे उत्तन डम्पिंग येथे कचऱ्याचा रोज डोंगर उभा रहात आहे . त्यातून स्थानिक नागरिकांना गंभीर समस्यांचा जाच सोसावा लागत आहे.
ओला व सुका कचरा १०० टक्के वेगळा करून दिल्यास शहरातील कचरा समस्या सुटून स्वच्छता , मानवी आरोग्य आणि पर्यावरण ह्यावर चांगला परिणाम होऊ शकतो . आता महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी ॲपचा वापर सुरु केला आहे.
रिसायकलिंक प्रा. लि. मार्फत सॉफ्टवेअर बेस्ड ॲप व वेब सोल्युशन डेव्हलप केले गेले आहे . पालिकेने त्यांच्या सोबत करारनामा करून कार्यादेश दिला आहे . सोसायटी, सदनिका, खाजगी व वाणिज्य आस्थापना यांना क्यू आर कोड दिले जातात. जे नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देतात त्यांच्या घरा वरील क्युआर कोड स्कॅन करून ॲप मध्ये तशी नोंद केली जाते . पालिकेचे मुकादम, आरोग्य निरिक्षक आदींसह इमारतीतील सफाई कामगार देखील मोबाईल मधील ॲपच्या माध्यमातून हे काम करू शकतो.
कचरा वर्गीकरण करण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येऊन इमारतींचा हाउसकीपिंग कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. घरगुती आणि निवासी सोसायटी स्तरावर स्कॅनिंगमध्ये हळूहळू सुका व ओला कचरा वर्गीकरणात वाढ होत आहे. यामुळे मिक्स कचरा कमी होऊन घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी मिक्स कचऱ्या मुळे पडणारा ताण कमी होईल असे पालिकेचे म्हणणे आहे .
आता पर्यंत ५ हजार ६२ सोसायटी मधील सुमारे २ लाख घरांना क्यूआर कोड लावण्यात आला आहे . सर्व सोसायटीचे काम पूर्ण झाल्यावर मंडई आदी ठिकाणी टप्याटप्याने क्यूआर कोड लावले जातील . काशीमीरा भागातील सुमारे ३० हॉटेल चा कचरा वेगळा नेण्यासाठी २ गाड्या व पथक नेमले आहे . एका झोपडपट्टीची सुद्धा निवड केली आहे . येत्या ५ ते ६ महिन्यात शहरातील सर्व निवासी व वाणिज्य मालमत्ताना क्यूआर कोड लावण्याचे काम पूर्ण केले जाईल असे उपायुक्त डॉ . सचिन बांगर यांनी सांगितले आहे .
शहरातील नागरीकांनी आपल्या घरातील, सोसायटी, आस्थापना मधील कचरा ओला, सुका व घातक कचरा वर्गीकरण करुन देण्यात यावा. तसेच क्यू आर कोड स्कॅन करून ऍपमध्ये नोंद करण्यासाठी रिसायकलिंग प्रा. लि. कंपनीचे प्रतिनिधी, मनपा मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी केले आहे.