मीरा रोड : शाळेवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुलांसहीत महिलेचं मनपा मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 02:43 PM2017-11-22T14:43:49+5:302017-11-22T14:47:02+5:30
मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी म्हणुन आपल्या दोन्ही मुलांसह आज बुधवारी महापालिका मुख्यालया बाहेर पालक महिलेने धरणे धरले.
मीरा रोड - मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी म्हणून आपल्या दोन्ही मुलांसह बुधवारी महापालिका मुख्यालयाबाहेर पालक महिलेने धरणे धरले. कम्युनिस्ट पक्षानेदेखील पालकास पाठिंबा दिला. तर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला असून सदर दोन्ही मुलांना अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिल्यानंतर धरणं आंदोलन मागे घेतले.
मीरा रोडच्या शितल नगरमधील कॉस्मोपोलिटीन शाळेत शिकणा-या निशाद शेख या महिलेच्या पहिली इयत्तेतील आसिफ व तिस-या इयत्तेतील आयशा या दोन मुलांना शाळेतून मनमानीपणे काढून टाकले होते. निशाद यांनी मनमानी शुल्क आकारणीबद्दल शाळेच्या व्यवस्थापना विरुद्ध पुढकार घेतल्याने दोघांमध्ये वाद होते. शाळेच्या फिर्यादीवरुन निशाद विरुद्ध मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल झाला.
दरम्यान शाळा व पालक यांच्या वादात आसिफ व आयशा या दोन विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत होता. निशाद यांनी बचाव समितीच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर उपसंचालक डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दोन वेळा मुलांना प्रवेश द्या म्हणून पत्रं देऊन देखील शाळेने त्यास केराची टोपली दाखवली. तर प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी देखील ठोस कार्यवाही केली नाही. लोकमत ने या बाबतचे वृत्त दिल्यावर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दखल घेत देशमुख यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी, यासाठी बुधवारी निशाद यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत पालिका मुख्यालया बाहेर धरणं धरलं. भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेदेखील निशाद यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धरण्यात सहभाग घेतला. वकील किशोर सामंत यांनी पालिकेला पत्रं देऊन दोन्ही मुलांना शाळेत प्रवेश द्यावा, शाळेची मान्यत रद्द करावी व आरटीई कायद्याची शहरात सक्तीने अमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली.
दरम्यान आंदोलकांशी उपायुक्त दीपक पुजारी यांनी चर्चा केली. प्रशासन अधिकारी देशमुख कामानिमित्त बाहेर असून त्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तसेच दोन्ही मुलांना अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालिका सहकार्य करेल, असे आश्वासन पुजारी यांनी दिले. गुरुवारी देशमुख आले की त्यांच्या सोबत एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ असे देखील पुजारी यांनी पालक व आंदोलकांना सांगितले. उपायुक्तांच्या आश्वासनानंतर धरणं आंदोलन मागे घेतल्याचे निशाद म्हणाल्या.