रात्रीच्या गाढ झोपेत मीरारोड हादरले; गॅस सिलेंडरचे एकामागोमाग ६ स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 07:16 PM2021-02-08T19:16:56+5:302021-02-08T19:17:29+5:30

Cylinder Blast : अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचण्या आधी एक सिलेंडरचा स्फोट होऊन ट्रकने पेट घेतला होता . 

Miraroad trembled in the deep sleep of the night; 6 explosions of gas cylinder in a row | रात्रीच्या गाढ झोपेत मीरारोड हादरले; गॅस सिलेंडरचे एकामागोमाग ६ स्फोट

रात्रीच्या गाढ झोपेत मीरारोड हादरले; गॅस सिलेंडरचे एकामागोमाग ६ स्फोट

Next
ठळक मुद्देसुदैवाने मोठ्या संख्येने असलेल्या अन्य सिलेंडरचे स्फोट झाले नाहीत अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. जीवित हानी झाली नसून काशीमीरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय इमारतीच्या मागील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मधील सिलेंडरचे लागोपाठ ६ स्फोट झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नंतर २ च्या सुमारास घडली आहे . स्फोटाने गाढ झोपेत असलेले मीरारोडवासीय हादरले. सुदैवाने मोठ्या संख्येने असलेल्या अन्य सिलेंडरचे स्फोट झाले नाहीत अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. जीवित हानी झाली नसून काशीमीरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

येथील शांती गार्डन सेक्टर ५ लगतच्या मोकळ्या मैदानात गॅस सिलेंडरने भरलेल्या दोन ट्रक पैकी एका ट्रक मधील गॅस सिलेंडर ने पावणे दोनच्या सुमारास पेट घेतला . सिलेंडरचा पहिला स्फोट झाल्यावर दुर्घटनेचा कॉल सिल्व्हरपार्क अग्निशमन केंद्रात आला. अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचण्या आधी एक सिलेंडरचा स्फोट होऊन ट्रकने पेट घेतला होता . 

जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा तसेच फॉमचा वापर केला . परंतु आग आटोक्यात येत नव्हती . काही अतंराने सिलेंडरचे स्फोट सुरूच होते . एकूण ६ सिलेंडरचे स्फोट झाले असे सांगण्यात आले . स्फोटांचा आवाज इतका प्रचंड होता कि मीरारोड परिसरात खळबळ उडाली . आजूबाजूच्या इमारतीतील लोक सुद्धा घाबरून घराबाहेर आले .  काही ठिकाणी काचा फुटल्या तर स्फोटा नंतर सिलेंडर आदींचे तुकडे लांब पर्यंत उडाले . 

 

स्फोटाच्या ठिकाणी आग लागली होती . बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली . स्फोट होताच लोकांची पळापळ व्हायची . अश्याच पळापळीत नित्यानंद नगर मधील केतन सोळंकी (२४) हा तरुण पडून जखमी झाला . त्याच्या मांडीला टाके पडले असून नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे . तर स्फोटा मुळे उडालेल्या  तुकड्यानी नेहा मलिक व विकास मलिक हे तरुण किरकोळ जखमी झाले . त्यांना पालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले . 

 

अग्निशमन दलाच्या सात अग्निशमन गाड्या, दोन टॅंकर, एक टिटीएल गाडी तसेच ५४ अधिकारी - जवान यांच्या सहाय्याने  पहाटे साडे तीनच्या सुमारास आग आटोक्यात आणल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले .  गॅस ने भरलेले सिलेंडर गळती वगैरे तपासून तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले अन्यथा स्फोटांची मालिका सुरु राहिली असती किंवा एकाच वेळी महाभीषण स्फोट होऊन मोठे नुकसान होण्याची भीती होती . आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट नसले तरी धूम्रपान करणारे वा समाजकंटक कारणीभूत असण्याची शक्यता बोराडे यांनी व्यक्त केली.

ह्या मोकळ्या मैदानात नियमितपणे गॅस सिलेंडरच्या गाड्या उभ्या केल्या जात होत्या . दुर्घटने वेळी देखील भारत पेट्रोलियमच्या सिलेंडरचे १ तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सिलेंडरचे १ असे दोन ट्रक व एक पिकअप व्हॅन होती .  एका वाहनामध्ये रिकामे वाणिज्य वापराचे   सिलेंडर होते. सदर गाडी ही ३१ तारखेपासून येथे उभी होती . 

तर एका कंपनीची गॅस सिलेंडरची गाडी उरण वरून रविवारी दुपारी येथे आली होती . सदर गाडीत गॅस ने भरलेले २३४ सिलेंडर होते . त्यातील ११३ सिलेंडरचे वितरण केले गेले होते . त्यामुळे १२१ भरलेले सिलेंडर ट्रक मध्ये होते .  एका गॅस सिलेंडरचा ट्रक विक्रांत आवटे यांचा तर एक वसईच्या शिवलाल बेनीवाल यांचा आहे . सदर सिलेंडर हे पिकअप मध्ये भरून राजेंद्र मिश्रा यांच्या इंडिक्यूट गॅस एजन्सी , शिवडी मार्फत वितरित केले जात होते अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे . 

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सदर दुर्घटनेची गांभीर्याने दाखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासह अश्या दुर्घटना रोखण्यासाठी नियमांची काटेकोर अमलबजावणी करायला लावण्याचे निर्देश दिले आहेत . त्या अनुषंगाने काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला आहे.

सुरक्षेची ऐशीतैशी 

सदर मोकळ्या मैदानात गॅसने भरलेले सिलेंडर वाहनां मध्ये नियमितपणे उभे केले जात असले तरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणतीच खबरदारी घेतली गेली नसल्याचे उघड झाले आहे . गॅस ने भरलेले सिलेंडरचा साठा असताना तेथे कोणी सुरक्षा रक्षक , कुंपण तसेच अग्निशामक यंत्रणा आदी काहीएक नव्हती . पालिकेच्या अग्निशमन विभागासह संबंधित प्राधिकरणां कडून ना हरकत घेण्यात आलेली नाही असे सकृतदर्शनी समोर आले आहे . शहरात अन्यत्र देखील भर रस्त्यावर किंवा मैदानात सिलेंडरने भरलेल्या गाड्या उभ्या केल्या जातात. 

Web Title: Miraroad trembled in the deep sleep of the night; 6 explosions of gas cylinder in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.