मीरारोड जलकुंभ उद्घाटन राड्याप्रकरणी सेना नगरसेविकेपाठोपाठ भाजपा नगरसेविकेची तक्रार, सेना नगरसेविकेसह 10 जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 12:34 PM2018-03-20T12:34:36+5:302018-03-20T12:34:36+5:30
गुढीपाडव्या दिवशी मीरारोडच्या शांती नगर भागात पालिका जलकुंभाच्या उद्घाटनावरुन शिवसेना नगरसेविकेस मारहाणप्रकरणी भाजपाच्या ४ नगरसेविकांसह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपा नगरसेविकेच्या तक्रारीवरुन शिवसेना नगरसेविकेसह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मीरारोड - गुढीपाडव्या दिवशी मीरारोडच्या शांती नगर भागात पालिका जलकुंभाच्या उद्घाटनावरुन शिवसेना नगरसेविकेस मारहाणप्रकरणी भाजपाच्या ४ नगरसेविकांसह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपा नगरसेविकेच्या तक्रारीवरुन शिवसेना नगरसेविकेसह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शांती नगर सेक्टर 2 मधील जलकुंभाचे उद्घाटन महापौर डिंपल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते उद्घाटनाचा प्रचार पत्रकं व सोशल मीडियावर भाजपाने केला. तर स्थानिक शिवसेना नगरसेविका दीप्ती भट यांनी पूर्वीपासून आपण पाठपुरावा केल्याचा सोशल मीडियावर प्रचार करत तसा फलक लावला होता. भाजपाच्या तक्रारी वरुन फलक काढायला लावल्या वरुन सुरू झालेल्या वादात प्रकरण हातघाईवर गेले.
सेना नगरसेविका भट यांच्या अंगावर ओबाडल्याच्या खुणा व मुका मार लागल्याने त्याांना पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नया नगर पोलिसांनी या प्रकरणी भट यांच्या जबानी नंतर भाजपाच्या नगरसेविका हेतल परमार, रुपाली मोदी,वंदना भावसार, सीमा शाह सह माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी व पदाधिकारी राधा नाडर या ६6 जणांविरोधात दंगल, मारहाण आदी कलमां खाली गुन्हा दाखल केला.
तर सोमवारी (19 मार्च) सायंकाळी भाजपा नगरसेविका हेतल परमार यांच्या फिर्यादी वरुन सेना नगरसेविका भट यांच्यासह उपजिल्हा संघटक स्नेहल सावंत, वर्षा कोटा, भावना पारेख, माला आचरेकर, प्राची पाटील, रेश्मा डोळस, जया गुप्ता, राजेश परब व झनक पंड्या अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील झनक यांनी असभ्य वर्तन केल्याची परमार यांची तक्रार असल्याने त्यांच्यावर विनयभंगाचे कलम लावण्यात आले आहे.