मोहरमनिमित्त भिवंडीमध्ये निघाल्या मिरवणुका; विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:37 AM2019-09-11T00:37:50+5:302019-09-11T00:38:07+5:30
२९ पंजे, ६८ ताजीयांची स्थापना, ढोलताशे वाजवून केले जागरण
भिवंडी : मोहरमनिमित्त शहरातील विविध भागात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांची मंगळवारी मिरवणूक काढून त्यांचे विसर्जन करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी सोमवारी रात्रीपासूनच ढोलताशे वाजवून जागरण करण्यात आले. तर काही ठिकाणी धार्मिक कार्यक्र म करण्यात झाले.
शहरातील भोईवाडा परिसरातील शिया पंथीयांनी हैदर मशीदमध्ये सकाळपासून धार्मिक कार्यक्र म सुरू होते. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो शिया मुस्लिमांनी गर्दी केली होती. दुपारी हैदर मशीद ते दर्गारोडवरील कोतवाल शहा दर्गापर्यंत मिरवणूक काढून ही मिरवणूक नंतर विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीसाठी जमलेल्या नागरिकांमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. करमणुकीच्या साधनांबरोबर खेळण्यांची दुकानेही येथे थाटण्यात आली होती.
शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात गणेशोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूने निघालेल्या मिरवणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोहरमनिमित्त शहरातील पॉवरलूम उद्योग बंद होते. त्यामुळे कामगारांनी आजचा दिवस आपल्या कुटुंबासह आनंदात घालविला. दुपारनंतर शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथील इराणी बांधवांनी मोहरमनिमित्ताने मिरवणूक काढून आपल्या अंगावर मारून व जखमा करून दु:ख व्यक्त केले. तर गैबीनगर येथून सायंकाळी निघालेला मोठा ताजीयाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ही ताजीयाची मिरवणूक व इराणी बांधवांची मिरवणूक एसटी स्थानकासमोरील चव्हाण कॉलनीत समारोप होऊन तेथे पंजा व ताजीया थंड करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी ताजीयाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.