बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराची मीरा रोड पोलिसांनी केली चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:22 AM2019-06-03T04:22:37+5:302019-06-03T04:22:44+5:30
सर्व स्तरांतून टीका : उत्साही पदाधिकाऱ्याने टाकलेल्या फोटोंवरून वाद
मीरा रोड : मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेमध्ये विश्व हिंदू परिषदेंतर्गत बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण शिबिरात आलेल्या सव्वाशे प्रशिक्षणार्थ्यांना बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षण देताना एअरगनने नेमबाजी शिकवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. बजरंग दलाच्या एका अतिउत्साही प्रचारकाने सदर शिबिराच्या फोटोंसोबत उत्तर प्रदेशच्या शिबिरातील फोटोही सोशल मीडियावर टाकल्याने वाद झाला. त्यातच सदर शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबीयांची असल्याने अशा प्रकारच्या प्रशिक्षणावरून टीकेची झोड जास्तच कठोर झाली आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत येणाºया बजरंग दलाच्या कोकण प्रांताचे शौर्य प्रशिक्षण वर्ग २०१९ चे आयोजन यंदा आ. मेहतांच्या शाळेत २५ मे ते १ जूनदरम्यान करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी राज्याच्या कोकण प्रांत तसेच गोव्यामधून एकूण सव्वाशे प्रशिक्षणार्थी आले होते. ते सर्व १८ ते ३५ वर्षे वयोगटांतील होते.
या प्रशिक्षणादरम्यानचे काही फोटो प्रशांत गुप्ता या बजरंग दलाच्या विस्तारकाने सोशल मीडियावर टाकले. सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमीमध्ये बजरंग दलाचे प्रशिक्षण असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले होते. शाळेच्या वर्गात बंदुकीसोबत असणारे प्रशिक्षणार्थी व खाली ठेवलेल्या बंदुकीचे फोटो सेव्हन स्क्वेअर शाळेतील होते. पण, जाळपोळ व बंदुकीने फायरिंग करतानाचे टाकलेले फोटो मात्र सदर शाळेतील नव्हते.
दरम्यान, सोशल मीडियावर टाकलेल्या सदर छायाचित्रांवरून खळबळ उडाली. मीरा रोडच्या आ. मेहतांच्या शाळेत गोळीबार करणे, जाळपोळ आदींचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारी डीवायएफआय, अॅड. संजय पांडे, आम आदमीचे ब्रिजेश शर्मा आदींनी केल्या. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच टीकेची झोड उठून पोलीस आदी यंत्रणांची धावपळ सुरू झाली.
नवघर पोलिसांनी याची माहिती घेऊन चौकशी सुरू केली. शाळेतील वर्गात व परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घेणार आहोत, असे निरीक्षक राम भालसिंग यांनी यासंदर्भात सांगितले. गुप्ताने टाकलेले फोटो सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडेसुद्धा चौकशी केली आहे.
मीरा-भाईंदर बजरंग दलाचे संयोजक चंद्रकांत झा यांनी सांगितले की, एअरगनच्या साहाय्याने शिबिरात नेमबाजीसह ज्युदो-कराटे, मल्लखांब, जमिनीवर सरकणे आदी विविध प्रकारच्या शारीरिक व आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले गेले. पण, जाळपोळ वा कोणत्याही खºया बंदुका नव्हत्या. याशिवाय गोरक्षा, धर्मांतरणविरोधी प्रकार रोखणे आदींवर चर्चासत्रे झाली. सोशल मीडियावर येथील शिबिराच्या छायाचित्रांसोबत दुसरीकडची छायाचित्रे टाकली गेली आणि कम्युनिस्ट विचारसरणींच्या काहींनी यातून चुकीच्या तक्रारी केल्याचे झा म्हणाले. एअरगन वापरल्या, यात काही चुकीचे नाही. सदर शाळा आ. मेहतांची असल्याने हा वाद जास्त वाढल्याचे ते म्हणाले.
तक्रारदारांनी मात्र भाजप आमदाराच्या शाळेत अशा प्रकारचे शस्त्रहाताळणीचे तसेच धर्मांध व द्वेषकारक प्रशिक्षण शिबिर कट्टरपंथींकडून चालवणे मीरा-भाईंदर शहरच नव्हे, तर देशाचे संविधान आणि समाजासाठी घातक असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली आहे.
मी भाजपचा आमदार आहे आणि बजरंग दलाचे शिबिर होते म्हणून चुकीच्या छायाचित्रांच्या आधारे चुकीचे वृत्त येत आहे. शाळा व मैदान आम्ही सुटीच्या दिवसांत भाड्याने देत असतो. त्यात गैर काय आहे? मी शिबिराची माहितीदेखील घेतली आहे.
जत्रेत फुगे फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एअरगनचे प्रशिक्षण देण्यात आले. यात गैर काय आहे? यासंदर्भातील बातम्या खोट्या आहेत, हे पालक आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पत्रकाद्वारे सांगितले जाणार आहे. - आ. नरेंद्र मेहता, शाळा संचालक