मीरारोडमध्ये ५२ जणांना कावीळ

By admin | Published: August 30, 2015 11:22 PM2015-08-30T23:22:55+5:302015-08-30T23:22:55+5:30

मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी

In Mirrod 52 people jaundice | मीरारोडमध्ये ५२ जणांना कावीळ

मीरारोडमध्ये ५२ जणांना कावीळ

Next

भार्इंदर : मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी सांगिले. मात्र, दूषित पाण्याचा शोध घेण्याऐवजी पालिकेने रहिवाशांनाच नोटीसा पाठवून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा अजब सल्ला दिला आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर २५० हुन अधिक कुटुंबांचे वास्तव्य असलेले ९ इमारतींचे सुंदरनगर हे गृहसंकुल वसले आहे. त्याला पालिकेच्या जलवाहिनीतून डिसेंबर २०१४ पासून सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी रहिवाशांनी काही राजकीय मंडळींकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पालिकेने दूषित पाणीपुरवठा कुठून होतो, त्याचा शोध घेतला नाही. मात्र त्यानंतरच्या कालावधीत रहिवाशांना दूषितऐवजी रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला. तद्नंतर मागीलप्रमाणे पुन्हा दूषित पाणी येऊ लागल्याने रहिवाशांनी पालिकेकडे जुलै महिन्यात तक्रारी केल्या होत्या. त्यावर पालिकेने दूषित पाणीपुरवठ्याचा शोध घेण्याऐवजी २० आॅगस्ट रोजी रहिवाशांनाच नोटीसा बजावून त्यात पालिकेच्या जुन्या जलवाहिनीवरुन घेण्यात आलेल्या नळजोडण्या बदलून त्या नवीन जलवाहिनीवरुन घ्याव्यात. त्यासाठी प्रती कुटुंबाने ५०० रु. प्रमाणे तर उर्वरीत खर्च सोसायटीने करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ए - ५ व ए - ६ या इमारतीतील रहिवाशांनी जुनी जलवाहिनी काढून पालिकेच्या नवीन जलवाहिनीवरुन नवीन नळजोडणी घेतली. तरीदेखील त्यांना पुन्हा दूषित पाणीपुरवठाच सुरु झाल्याने त्याचा शोध रहिवाशांनी घेतला असता २००१ मध्ये टाकलेल्या पालिकेच्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांना स्वच्छ तर २००८ मध्ये टाकलेल्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान हे दूषित पाणी प्यायल्याने येथील ५२ जणांना कावीळ झाल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.
याप्रकरणी त्यांनी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्याकडे धाव घेतली असता उपमहापौरांनी गृहसंकुलाला भेट देऊन माहिती घेतली. त्यावर त्यांनी बोलविलेल्या बैठकीत पालिकेच्या नवीन जलवाहिनीस कुठेतरी गळती झाल्यानेच रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत असून दिलेल्या नळजोडण्या पुन्हा जुन्या जलवाहिनीवरुन देण्याचे निर्देश दिले. परंतु, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी (३१ आॅगस्ट) वरिष्ठ अधिकाऱ्यांसाबेत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: In Mirrod 52 people jaundice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.