शिलाई मशीनच्या खरेदीत गैरव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 12:14 AM2019-12-08T00:14:07+5:302019-12-08T00:15:44+5:30
बाजारभावापेक्षा ४,८०० जादा किंमत मोजल्याचा केला दावा, आयुक्तांकडे तक्रार
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने गरीब-गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी दिलेल्या शिलाई मशीनमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिवसेना नगरसेविका तथा समितीच्या माजी सदस्या कुसुम गुप्ता यांनी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊ न शनिवारी माहिती दिली. बाजारात सहा हजार ८०० रुपयांना मिळणारी मशीन पालिकेने ११ हजार ६०० ला खरेदी केली आहे. अशा एकूण १७० मशीन खरेदीसाठी साडेएकोणीस लाख रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.
१५ सदस्यांच्या महिला बालकल्याण समितीमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. सभापती आणि उपसभापतीपदी भाजपच्या नगरसेविका अनुक्रमे दीपिका अरोरा आणि वंदना भावसार होत्या. शिवाय, शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेविकाही सदस्या आहेत. समितीतर्फे गरीब आणि गरजू महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शिलाई मशीनचे वाटप केले जाते. त्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात २० लाखांची तरतूद केलेली होती.
तत्कालीन उपायुक्त दीपक पुजारी यांनी गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनवाटप करण्यासाठी म्हणून गोषवारा दिला असता समितीच्या सर्व नगरसेविकांनी तो सर्वानुमते मंजूर केला होता. त्यानंतर प्रशासनाने निविदा मागवल्या असता चार निविदा आल्या होत्या. त्यातील सर्वात कमी दराची निविदा म्हणून श्रीसाई श्रद्धा महिला संस्थेला निविदा निवड समितीने १४ आॅगस्टला मान्यता दिली होती. त्यानंतर पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी ३० आॅगस्टला उषा कंपनीची फॉल बिडिंग, एम्ब्रॉयडरी आदी कामे करण्याची सुविधा असलेल्या १७० मशीन पुरविणे कामी कार्यादेश दिले होते. या कंपनीची ११ हजार ६०० रुपये किमतीनुसार मशीन खरेदीसाठी १९ लाख ५५ हजार रुपयांचा खर्च होणार होता.
समितीच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक नगरसेवकास त्यांच्या प्रभागातील गरजू महिलेला देण्यासाठी एक शिलाई मशीन दिली जाते. पालिकेत ९५ नगरसेवक असताना सत्ताधारी भाजपने १७० शिलाई मशीन खरेदी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याची शक्यता वर्तवली गेली होती.
दरम्यान, पालिकेने खरेदी केलेल्या उषा कंपनीच्या मार्वेला मॉडेलच्या शिलाई मशीनचे वाटप समितीच्या वतीने केले गेले. त्यातही शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक मशिन प्रभागातील महिलेला देण्यासाठी दिली गेली. भाजपच्या अनेक नगरसेवकांना केवळ एकच मशीन देण्यात आली होती.
शिवसेनेच्या नगरसेविका गुप्ता यांनीही त्यांना मिळालेली एक मशीन प्रभागातील महिलेस वितरित केली होती. या मशीनच्या पॅकिंग बॉक्सवर सर्व करांसहित किंमत नऊ हजार ८५० रुपये इतकी छापलेली होती. त्यातही या मशीनच्या किमतीबाबत कुसुम आणि त्यांचे पती संतोष यांनी भार्इंदर पूर्वेच्या दोन शिलाई मशीन विक्रेत्यांकडून या मॉडेलचा दर मागवला असता त्यांना धक्काच बसला.
श्रीभवानी व अंबिका या दोन्ही अधिकृत वितरकांनी मशीनचा दर सहा हजार ८०० रुपये इतका असल्याचे लेखी कोटेशन गुप्ता यांना दिले. त्यानंतरही गुप्ता यांनी आॅनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीकडून मशीनची माहिती घेतली असता तेथेही सात हजार २०० रुपयेच किमत होती.
भार्इंदरमध्ये ही मशीन सहा हजार ८०० रुपयांना मिळत असताना पालिकेने मात्र ११ हजार ६०० रुपयांना खरेदी केल्याने या मशीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार कुसुम यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक यांना केली आहे. पत्रकार परिषदेत तशी माहिती त्यांनी दिली.
गुप्ता यांनी कोणाचेही नाव न घेता या प्रकरणाची सखोल चौकशी आयुक्तांनी करायला हवी, अशी मागणी केली. चौकशीनंतरच यात कोण कोण गुंतले आहे हे समोर येईल, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे या प्रकरणाचे पुढे काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
कार्यादेश नियमानुसारच काढला : दामोदर संखे
पालिका अधिकारी दामोदर संखे यांनी समितीच्या ठरावानंतर शासनाच्या संकेतस्थळावरून निविदा मागवण्यात आल्या होत्या. चारपैकी कमी दराची निविदा असल्याने नियमानुसार श्रीसाई श्रद्धा महिला संस्थेला कार्यादेश देण्यात आले होते असे सांगितले. १७० पैकी १२९ मशीन आतापर्यंत महापौर, सभापती आणि नगरसेवक यांच्या शिफारशींनुसार वितरित केलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.