दु:खावेग सावरून मिळवले ८० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:56 AM2018-06-01T00:56:56+5:302018-06-01T00:56:56+5:30
आपल्या चुलतभावाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याने मनाची तयारी केली.
ठाणे : आपल्या चुलतभावाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याने मनाची तयारी केली. मानसिक धक्क्यातून सावरत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून बारावीची परीक्षा दिली आणि डीएव्ही महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून तब्बल ८० टक्के गुणांसह यश मिळवले आहे, ते दिवा येथील निखिल भोसले या तरुणाने.
काही कारणास्तव राहत्या घरी निखिलचा चुलत भाऊ सिद्धेशचा मृत्यू झाला. सिद्धेशच्या अकाली जाण्याचा धक्का बसलेल्या निखिलने काही दिवस जेवण, अभ्यास सर्वच सोडून दिले होते. निखिल हा बारावीची परीक्षा देईल की नाही, याबद्दलही साशंकता होती. मात्र, पुतण्याच्या मृत्यूचे दु:ख काही काळ बाजूला ठेवून बळीराम अर्थात निखिलचे वडील यांनी आपल्या दोन्ही मुलांना समजावून अभ्यास करण्याच्या दृष्टीने धीर दिला. निखिलचा लहान भाऊ रोहित हासुद्धा यंदा दहावीला होता. त्यालाही परीक्षा देण्यासाठी धीर दिला. वडिलांच्या आधारानंतर निखिलने अभ्यास केला. प्रचंड मेहनत केली आणि परीक्षा दिली.
बुधवारी लागलेल्या निकालानुसार वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या निखिलला ८० टक्के गुण मिळाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. दिवा प्रवासी संघटनेनेही गुरुवारी त्याचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.