काेर्टाची दिशाभूल, गँगस्टर भासविले! जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:34 AM2023-02-25T09:34:25+5:302023-02-25T09:34:49+5:30
आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
ठाणे - ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एका खटल्यात ठाणे पोलिसांनी आपणावर चक्क २४ गुन्हे दाखल असल्याचे नमूद करणारे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे ते म्हणाले. तसेच पोलिसांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यात आपल्याला गँगस्टर असल्याचे भासविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली. तसेच ज्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्याच न्यायालयात तीन महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. यासंदर्भात आव्हाड यांनी माहिती दिली. तर या व्यक्तीच्या मागे सर्वशक्तिमान व्यक्तीसह राज्य सरकारही उभे होते. आर्थिक शक्तीच्या जोरावर ती व्यक्ती आपली तलवार सर्वोच्च न्यायालयात चालवीत होती, असा आरोपही त्यांनी केला.
करमुसे प्रकरण वगळता माझ्यावर एकही शारीरिक इजेचा गुन्हा नाही. जे २४ गुन्हे दाखविले आहेत. ते राजकीय-सामाजिक आंदोलनातील असून २० गुन्हे निकाली निघाले आहेत. आंदोलनातील गुन्हे असणारी माणसेच राजकारणात असतातच; असे गुन्हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही आहेत. मग, त्यांनाही गुन्हेगार म्हणणार का, असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.
पोलिसांनी असे राजकारण का करावे?
जितेंद्र आव्हाड यांनी प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कमेंट करतात असे आरोप माझ्यावर होत आहेत. जर मी अशी टीका केली आहे, तर माझ्यावर तशी केस का घेतली नाही? अमरसिंह जाधव यांचे हे प्रतिज्ञापत्र आयुक्तांना विचारल्याशिवाय सादर झालेले नसणार! असेही त्यांनी सांगितले. दरम्यान,खटला मजबूत व्हावा, यासाठीच हरहर महादेव व ३५४ चा गुन्हा माझ्यावर नोंदविला. पोलिसांनी राजकारण का करावे? असा सवालही त्यांनी केला.
अहवालही त्यांना हवा तसाच येईल
सहायक आयुक्त महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठविली जाईल आणि त्यातील आवाज हा त्यांचा नसेल, असाच अहवाल येईल, असा दावा आव्हाड यांनी केला.
आव्हाडांची चौकशी होणार याचा आनंद
आपल्याला केलेल्या मारहाण प्रकरणी तपास सुरू ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. कोणीही चौकशी करावी. आव्हाडांची चौकशी होणार याचा आनंद असल्याचे अनंत करमुसे यांनी म्हटले आहे..