भिवंडीतील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेस दहा तास बसविले पायरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:02 PM2021-10-10T17:02:39+5:302021-10-10T17:02:47+5:30
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णलयात धाव घेत या महिलेस रुग्णलयात दाखल करून घेतले आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी- राज्यात आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघत असताना भिवंडी शहरातील स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथील वैद्यकीय व्यवस्थेचा सावळा गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रसूती वेदना सुरु झाल्याने प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या आदिवासी महिलेला खासगी रक्त चाचण्या व रक्ताची आवश्यकता असल्याने या सुविधा उपलब्ध न करता तिला रुग्णालयात प्रवेश देण्यास नकार दिल्याने आदिवासी महिला तब्बल दहा तास रुग्णालयाच्या पायऱ्यांवर प्रसूती वेदनांनी विव्हळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून शनिवारी रात्री श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णलयात धाव घेत या महिलेस रुग्णलयात दाखल करून घेतले आहे.
रोहिणी मारुती मुकणे ( वय २८ वर्षे ) असे गरोदर असलेली आदिवासी महिलेचे नाव असून या महिलेस प्रसूती वेदना होत असल्याने प्रसूती साठी शनिवारी दुपारी ती इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पती सोबत दुपारी एक वाजता आली होती. मात्र बाहेरून तपासण्या आणि रक्त घेऊन येत नाही तोपर्यंत दाखल करून घेणार नाही असे कारण देत या महिलेस रुग्णलयात दाखल करून घेण्यास तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी नकार दिल्याने हि महिला रात्री अकरा वजेपर्यंत रुग्णालयाच्या पायऱ्यांवर प्रसूती वेदनेने विव्हळत होती.
हा प्रकार या ठिकाणी आलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात आला असता या महिलेची विचारपूस केली असता सदर धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनतर श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठत य महिलेस उपचरासाठी दाखल करून घेतले. विशेष म्हणजे तब्बल दहा तास सदर महिला रुग्णालयांच्या पायऱ्यांवर बसून प्रसूती वेदनेने व्हीवळत होती. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले असून महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्याने रविवारी नातेवाईकांनी बाहेरून रक्त उपलब्ध करून दिले असून त्यानंतर तिची प्रसूती केली जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे .