ड्रेनेजच्या कामाची ३० लाखांची फाइल गहाळ?; अपक्ष नगरसेवकाचा स्थायीत गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 01:10 AM2020-01-18T01:10:53+5:302020-01-18T07:14:31+5:30
पोलिसात तक्रार करण्याचा इशारा
कल्याण : केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवक कासीफ तानकी यांच्या प्रभागातील ड्रेनेजच्या विकासकामाची ३० लाख रुपये निधीची फाइल गहाळ झाली आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून त्यांच्या प्रभागात हे काम होऊ शकलेले नाही. याप्रकरणी तानकी यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रश्न उपस्थित करून फाइल गहाळ झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावर तानकी यांनी सबुरीने घ्यावे. अन्यथा, पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करावी, असा सल्ला सभापती विकास म्हात्रे यांनी त्यांना दिला आहे.
केडीएमसीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तानकी हे कल्याण पश्चिमेतील एका प्रभागातून निवडून आले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपनेही त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तानकी यांनी शिवसेनेला समर्थन देऊनदेखील त्यांच्या प्रभागात ड्रेनेजची ३० लाख रुपये खर्चाची फाइल तयार केली. ही फाइल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना आता मिळेनाशी झालेली आहे. तीन वर्षांपासून ते याप्रकरणी पाठपुरावा करत आहेत. यापूर्वी तानकी हे एक वर्षाची गॅप सोडून स्थायी समिती सदस्य होते. आताही शिवसेनेने त्यांना स्थायी समिती सदस्यपदाची संधी दिली आहे. शुक्रवारी पहिल्याच समितीच्या बैठकीत तानकी यांचा आवाज वाढला. त्यावर सभापती यांनी सबुरीचा सल्ला दिला. हा विषय पटलावर नाही. सभेच्या शेवटी घेऊ, असे सांगितले. ३० लाख रुपये खर्चाच्या विकासकामाची फाइल गहाळ झाली की, चोरीला गेली, याचे उत्तर प्रशासनाने आजच द्यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यावर सभापतींनी फाइल शोधून काढा, असे आदेश प्रशासनाला दिले आहे. पुढील सभेपर्यंत फाइल मिळाली नाही, तर तानकी यांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा मार्ग मोकळा आहे.
यापूर्वीही प्रभागातील विकासकामे प्रभाग मुस्लिमबहुल असल्याने केली जात नसल्याचा आरोप करीत स्थायी समितीच्या बैठकीत दोन वर्षांपूर्वी तानकी यांनी आवाज उठवत ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, विकासकामाविषयी तानकी पुन्हा आक्रमक झाले आहे. आपल्या प्रभागात कामे होत नसल्याविषयी त्यांनी हतबलता व्यक्त केली. तानकी हे त्यांच्या फाइलविषयी पोटतिडकीने बोलत असताना भाजप सदस्यांनी दबक्या आवाजात त्यांच्यावर भाजपने अन्याय केला नसून, शिवसेनेने केला आहे. भाजप त्यांना न्याय देणार आहे, असे मत व्यक्त केले. या प्रकारामुळे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
फाइल गहाळ करणारे कोण?
विकासकामांच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी सदस्यांना स्वत:ला महापालिकेत चकरा माराव्या लागतात. महिला-बालकल्याण समितीच्या माजी सभापती वैशाली पाटील या तर आयुक्तांच्या दालनात रडल्या होत्या. त्याचबरोबर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बसपाच्या नगरसेविका सोनी अहिरे यांनाही महासभेत कामे मंजूर होत नसल्याने रडू कोसळले होते. वैशाली पाटील यांच्या प्रभागात ५० लाख रुपये खर्चाची भाजी मंडईची फाइल तयार करण्यात आली होती. ती हरवली होती. मात्र, त्यानंतर ती सापडली. आता त्याच फाइलमधील दोन महत्त्वाचे कागद गहाळ आहे. च्त्यामुळे तानकी यांनी केलेल्या आरोपाच्या पुनरावृत्तीने फाइल्स गहाळ करणारे कोण अधिकारी की सत्तेमधील लोक, असा संशयास्पद प्रश्न उपस्थित केला जात आहे.