ठाण्यातून बेपत्ता मुलगा नवी दिल्लीमध्ये सापडला
By जितेंद्र कालेकर | Published: September 2, 2024 10:42 PM2024-09-02T22:42:11+5:302024-09-02T22:42:25+5:30
ठाणे नगर पाेलिसांनी घेतला शाेध : अभ्यासाच्या तणावातून साेडले घर
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अभ्यासाच्या तणावातून काॅलेजला दांडी मारणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाला वडिलांनी जाब विचारल्यानंतर त्याने ठाण्यातील आपले घर साेडले हाेते. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे नगर पाेलिसांनी त्याचा चार राज्यांमध्ये शाेध घेतल्यानंतर ताे नवी दिल्ली भागात आढळला. त्याला आता सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी साेमवारी दिली.
ठाण्यातील एका नामांकित काॅलेजमध्ये शिकणारा प्रवीण शर्मा (नावात बदल) हा मुलगा गेल्या काही दिवसांपासून काॅलेजलाच गेला नसल्याची माहिती त्याच्या पालकांना मिळाली. याचाच जाब विचारल्यानंतर प्रवीण याने घरी येण्याऐवजी रेल्वेने थेट नवी दिल्ली गाठली. दरम्यान, त्याचा सर्वत्र शाेध घेऊनही ताे ठाणे शहर परिसरात न आढळल्याने याप्रकरणी त्याच्या अपहरणाची तक्रार १४ ऑगस्ट राेजी त्याच्या पालकांनी ठाणेनगर पाेलिस ठाण्यात दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक सपना ताटे-केचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत मारकड, पोलिस हवालदार विक्रम शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शाेध घेतला असता, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तसेच दिल्ली येथे त्याचे लाेकेशन मिळाले. त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी शाेध घेतल्यानंतर त्याला २७ ऑगस्ट राेजी दिल्लीतून ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले.
या तपासामध्ये तांत्रिक माहिती मिळविण्यासाठी ठाणे सायबर सेल विभागातील वरिष्ठ पाेलिस निरीक्षक प्रकाश वारके यांच्यासह पाेलिस अंमलदार समाधान माळी, विजय खरटमल, प्रवीण इंगळे यांनी मदत केली. प्रवीण हा संगणक अभियात्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. गेल्या वर्षी त्याला तीन विषयांमध्ये कमी गुण मिळाले. यातूनच ताे गेल्या काही दिवसांमध्ये अभ्यासाच्या तणावात हाेता. त्यामुळेच ताे काॅलेजमध्येही जात नव्हता. याचाच जाब विचारल्यानंतर त्याने घर साेडल्याचे पाेलिसांना सांगितले. त्याचे समुपदेशन केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सपना ताटे यांनी सांगितले.