ठाण्यातून बेपत्ता तरुणीचा पुण्यात लागला छडा
By जितेंद्र कालेकर | Published: December 8, 2020 11:14 PM2020-12-08T23:14:23+5:302020-12-08T23:16:52+5:30
ठाण्यातून अचानक बेपत्ता झालेल्या एका उच्चशिक्षित २२ वर्षीय तरुणीचा पुण्यातून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. आपली मुलगी सुखरुप मिळाल्याने कुटूंबियांनी नौपाडा पोलिसांचे आभार मानले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातून बेपत्ता झालेल्या एका २२ वर्षीय तरुणीचा पुण्यातून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. लग्नासाठी कुटूंबीयांनी दबाव आणल्यामुळे आपण घर सोडल्याचे चौकशीमध्ये तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या सीटी स्कॅन विभागामध्ये शिक्षण घेणारी ही तरुणी ठाण्याच्या चरईमध्ये वास्तव्याला आहे. ती २ डिसेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी तिच्या कुटूंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार महेंद्र घोसाळकर आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर काळे यांच्या पथकाने या तरुणीचा ती शिक्षण घेत असलेल्या मुंबईतील रुग्णालयात शोध घेतला. तेंव्हा तिच्या एका मित्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या तरुणीला नौपाडा पोलिसांच्या या पथकाने पुण्यातील शिवाजीनगर येथील एका हॉटेलमधून तिचा शोध घेतला. तिच्याच मित्राच्या मदतीने तिला विश्वासात घेऊन तिला ताब्यात घेतले. करियर करण्याची इच्छा असतांनाही कुटूंबियांनी लग्नासाठी दबाव आणल्यामुळे आपण घर सोडल्याची कबूली तिने पोलिसांना दिली. तिला ५ आॅक्टोंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कुटूंबियांच्या सुखरुपपणे स्वाधीन करण्यात आले. आपली मुलगी सुखरुप मिळाल्याने कुटूंबियांनी नौपाडा पोलिसांचे आभार मानले.