संगणकासह महत्त्वाच्या फाइल झाल्या गहाळ, दिवा प्रभाग समितीत प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:15 AM2020-09-01T03:15:04+5:302020-09-01T03:16:08+5:30
कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरांत एकीकडे अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनावर टीका होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे संगणक आणि फाइल गहाळ झाल्याने पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयातील संगणक आणि काही महत्त्वाच्या फाइल गहाळ झाल्या असून याची चौकशी आता सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या ज्या दिवशी बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री संगणक आणि फाइल गहाळ झाले आहेत. यावेळी कार्यालयात दिवा प्रभाग समितीचे तत्कालीन सहायक आयुक्त येऊन गेल्याची नोंद सुरक्षारक्षकांनी केली आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरांत एकीकडे अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनावर टीका होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे संगणक आणि फाइल गहाळ झाल्याने पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेतील उपायुक्तांसह सहायक आयुक्तांवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी १७ आॅगस्ट रोजी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. राज्य शासनाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच दोन उपायुक्त तसेच चार सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी ठाणे महापालिकेच्या सेवेत दाखल झाल्याने संध्याकाळी उशिरा बदल्यांची आॅर्डर काढण्यात आली होती. यामध्ये कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची मुंब्रा, तर मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर, दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांची निवडणूक विभागात बदली केली आहे. या बदल्यांमुळे अधिकारीवर्गात काही प्रमाणात नाराजीचे वातावरणदेखील असल्याची चर्चा आहे.
बदल्या झाल्या त्याच दिवशी रात्री घडला प्रकार
ज्या दिवशी या बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री उशिरा दिवा प्रभाग समिती कार्यालयातील संगणक आणि काही महत्त्वाच्या फाइल गहाळ झाल्या असल्याची खात्रीलायक माहिती उघड झाली आहे. ठाणे महापालिका मुख्यालयातून दोन संगणक तत्कालीन आयुक्तांच्या मागणीनुसार दिवा प्रभाग समिती कार्यालयातून मागवण्यात आले होते.
दिवा प्रभाग समितीच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार आणि कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार १७ आॅगस्ट रोजी सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.४६ वाजता तत्कालीन
सहायक आयुक्त पुन्हा दिवा प्रभाग समिती कार्यालयात आल्याची नोंद आहे.
च्यामुळे या प्रकरणात आता काय कारवाई होणार, असे प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात दिवा
प्रभाग समितीच्या तत्कालीन सहायक आयुक्तांशी संपर्क
केला असता तो होऊ शकलेला नाही.