टीएमटीचे मिशन घोडबंदर

By अजित मांडके | Published: March 25, 2023 03:58 PM2023-03-25T15:58:29+5:302023-03-25T15:58:56+5:30

इलेक्ट्रीक बसच्या फेऱ्या वाढविण्याबरोबर नव्याने दाखल होणाऱ्या बस या मार्गावर सोडण्याचा विचार

Mission Ghodbunder of TMT by Electric buses | टीएमटीचे मिशन घोडबंदर

टीएमटीचे मिशन घोडबंदर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस प्रवासासाठी उपलब्ध होत आहेत. त्यात आता परिवहनमध्ये प्रवाशांची संख्या वाढत असून परिवहनच्या उत्पन्नात देखील वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. परंतु सर्वाधिक उत्पन्न आणि प्रवासी असलेल्या घोडबंदरकडे आता परिवहनने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात दाखल होणाºया नवीन बस अधिक क्षमतेने घोडबंदर मार्गावर सोडण्याचा विचार सुरु झाला आहे. याच मार्गावर इतर प्राधिकरणाच्या व खाजगी बस देखील धावत आहेत. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी परिवहनेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३०० बस आहेत. तर त्यावर १५०६ चालक, वाहक व इतर कर्मचारी सेवेत आहेत. परिवहनच्या ताफ्यात आता टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस येऊ घातल्या आहेत. पहिल्या टप्यात ११ बस सेवेत दाखल झाल्या आहेत. तर जून अखेर पर्यंत सर्व १६५ इलेक्ट्रीक बस सेवेत दाखल होणार आहेत. या बसचे तिकीट कमी असल्याने प्रवाशांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यात परिवहनचा यापूर्वी खर्च हा वार्षिक ४१० कोटींच्या आसपास होता. परंतु सातवा वेतन आयोग, कर्मचाºयांना देण्यात येणारी पद्दोन्नती, सेवा निवृत्त कर्मचाºयांचे पेन्शन, कर्मचाºयांची थकबाकी व इतर परिवहनसाठी लागणाºया साहित्यामुळे परिवहनला खर्च हा आजच्या घडीला ५६८ कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे परिवहनला आजही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान नवीन इलेक्ट्रीक बसचे तिकीट कमी असल्याने परिवहनमधून प्रवास करणाºया प्रवाशांबरोबर उत्पन्न देखील वाढले आहे.

दरम्यान बेस्ट, नवीमुंबई अथवा मिरा भाईंदर प्राधिकरणाने घोडबंदरकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. बेस्टने आपल्या ताफ्यातील इलेक्ट्रीक बस अधिक क्षमतेने या मार्गावर सोडल्या आहेत. त्यातही इलेक्ट्रीक बसचे तिकीट कमी असल्याने प्रवाशांचा देखील त्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यातही मागील काही वर्षात या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. त्यामुळे विविध प्राधिकरणाबरोबर खाजगी बस, शेअर रिक्षा देखील या मार्गावर अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा प्रमुख मार्ग असलेल्या या मार्गावर टीएमटीने देखील आता आपले लक्ष अधिक केंद्रीत केले असून या मार्गावर बसची क्षमता वाढविण्याबरोबर बसच्या फेºया वाढविल्या जाणार आहेत. त्यातही सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस या मार्गावर बसच्या अधिक फेºया सोडल्या जाणार आहेत. तसेच या मार्गावर इलेक्ट्रीक बस अधिक सोडून प्रवाशांना आपलेसे करण्याचा परिवहनचा मानस असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार नवीन मार्ग शोधणे, बंद मार्ग सुरु करणे, येथील मार्गांचा नव्याने सर्व्हे करणे आदी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी परिवहन समिती देखील परिवहन सेवेला मदत करीत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Mission Ghodbunder of TMT by Electric buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे