शासनाच्या मिशनमध्ये नव्या उमेदीचे तरुण
By admin | Published: August 6, 2015 01:38 AM2015-08-06T01:38:30+5:302015-08-06T01:38:30+5:30
नव्या विचारांची शासकीय यंत्रणेशी सांगड घालण्यासाठी मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रम सुरू करण्यात आला असून तरुणाईच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब
मुंबई : नव्या विचारांची शासकीय यंत्रणेशी सांगड घालण्यासाठी मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रम सुरू करण्यात आला असून तरुणाईच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब शासनाच्या ध्येय-धोरणांत पुरेपूर उमटण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच उपयोग होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्र मास मंत्रालयात प्रारंभ झाला. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत निवडलेल्या ४० प्रशिक्षणार्र्थींसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
शासनामध्ये काम करीत असताना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी नवा विचार आणि शासकीय यंत्रणांची सांगड घालण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की उमेदवारांना अनुभव मिळण्यासोबतच शासनालाही त्यांच्यातील नव्या दृष्टिकोनाचा
लाभ मिळण्यास निश्चितच मदत होईल. त्यांच्या कामाचा अहवाल आपण बघू. निवड झालेल्या उमेदवारांना राज्यात विविध
योजनांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. अशी संधी मिळाली असली तरी शासनाचे नियम व आचारसंहिता याचे त्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आणि एक वर्षाच्या संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेले २५ वर्षांखालील वयोगटातील पदवीधर या उपक्रमासाठी पात्र आहेत. राज्यातील आणि राज्याबाहेरून ४,९३९ उमेदवार प्राथमिक चाळणीत पात्र ठरले. (विशेष प्रतिनिधी)