शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मिशन 'कमळ'; ठाण्यात भाजपानं आखली जबरदस्त रणनिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 05:23 PM2022-06-09T17:23:55+5:302022-06-09T17:24:39+5:30
ठाणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत अंतिम झाल्याने कोणाला उमेदवारी मिळणार, ...
ठाणे :
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत अंतिम झाल्याने कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाचा पत्ता कापला जाणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी भाजपने आता रणनीती आखली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोपरी-पाचपाखाडीतून भाजपने आता शिवसेनेच्या नाराजांना आपलेसे करण्यासाठी फोनद्वारे संपर्क साधणे सुरू केले आहे. तसेच मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते ज्यांना मिळाली होती, अशांनाही आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महिलांचे आरक्षण पडल्यानंतर कोण मैदानात राहणार आणि कोणाला तिकीट मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपने शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नाराजांना आपलेसे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार शहरात ‘मिशन कमळ’ राबविण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.
भाजपने आपल्या पक्षातील इच्छुकांना कामाला लावल्यानंतर बूथपातळीवर पक्षाची बांधणी सुरू केली आहे. परंतु, यापुढे जाऊन त्यांनी आता इतर पक्षांतील नाराजांना आपलेसे करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कोपरी-पाचपाखाडी परिसरातील नाराज असलेल्या किंबहुना मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्यांना भाजपच्या वरिष्ठ मंडळींकडून फोनद्वारे संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. माजी खासदारांसह पाचजण नाराज मंडळींची मनधरणी करीत असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट हा परिसरही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र याच भागावर आता भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यात शाखाप्रमुख, शिवसेनेतील नाराज आणि माजी नगरसेवक यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून पक्षप्रवेश करण्यासाठी गळ घातली जात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.
सत्ताधारी महाविकास आघाडीतील जे नाराज आहेत, ते संपर्क साधत आहेत. त्यांच्यातील जे योग्य वाटत आहेत, त्यांना प्रवेश दिला जात आहे. यापूर्वीदेखील त्याच माध्यमातून प्रवेश देण्यात आला आहे.
- संजय केळकर, आमदार, भाजप, ठाणे