चूक एचएससी बोर्डाची, मात्र मनस्ताप होतोय विद्यार्थ्यांना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:48 AM2019-01-31T00:48:04+5:302019-01-31T00:48:23+5:30
हॉल तिकिटात घोळ; विद्यार्थी भारतीचा बोर्डाला दणका
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे (एचएससी) बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉल तिकिटांमध्ये चुका असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चूक सुधारण्यासाठी महाविद्यालये प्रत्येक चुकीसाठी १०० ते २०० रुपये आकारत असल्याने चूक कुणाची आणि भुर्दंड कुणाला, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी भारती’कडे धाव घेतली. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने वाशी कार्यालयात धडक देत याविषयी जाब विचारताच संबंधित महाविद्यालयांवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.
विद्यार्थी भारतीच्या महाराष्ट्र कार्याध्यक्ष साक्षी भोईर म्हणाल्या की, परीक्षेचा हंगाम जवळ येत आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले असून त्यावर माध्यम आणि विषयांसंदर्भात अनेक चुका दिसत आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी ऐन परीक्षेच्या तोंडावर महाविद्यालये विद्यार्थ्यांची अडवणूक करत आहेत. महाविद्यालये त्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येक चुकीमागे १०० ते २०० रुपये घेत आहेत. यासंदर्भात विविध महाविद्यालयांतील २५ विद्यार्थ्यांनी विद्यार्थी भारतीकडे तक्रार केली होती. मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील नामांकित महाविद्यालयांचा यात समावेश आहे.
या विद्यार्थ्यांची कैफियत मांडण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने वाशी कार्यालयाला भेट देऊ न बोर्डाचे सचिव जितेश पाटील यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळात साक्षी भोईर, सलोनी तोडकारी आदींचा समावेश होता. यावेळी जितेश पाटील यांनी महाविद्यालये चूक सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेत असतील, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी हा प्रश्न लवकर न सुटल्यास विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राज्य अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी दिला आहे.
१०० ते २०० रुपयांची केली मागणी
डोंबिवलीतील एका नामांकित महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने सांगितले की, मी कला शाखेची विद्यार्थिनी आहे. २१ फे बु्रवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत असून माझे इंग्रजी माध्यम आहे. मात्र, माझ्या हॉल तिकिटावर मराठी माध्यमाचा उल्लेख आहे. हॉल तिकीट दोनतीन दिवसांपूर्वी हातात आले आहे. त्यात दुरुस्ती करण्यासाठी महाविद्यालय १०० ते २०० रुपयांची मागणी करत आहे. सध्या कॉलेजला अभ्यासासाठी सुटी असल्याने इतर कुणाच्या हॉल तिकिटामध्ये चुका आहेत का, हे माहीत नाही.