अखेर मिस्टी बचावली; अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या मांजरीला वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 04:16 PM2021-10-11T16:16:32+5:302021-10-11T16:22:33+5:30
Cat Saved in Thane : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची कामगिरी
ठाणे : मराठी वाहिनीवरील नामांकित अभिनेत्री गौरी कुलकर्णी हीची मांजर राहत्या घराच्या गॅलरीच्या सज्जवर जाऊन अडकल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. त्या मांजराला वेळीच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने मोठ्या कौशल्याने पकडून कुलकर्णी कुटुंबियांच्या स्वाधीन केले. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या मांजराला त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.
घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरातील लरीस टॉवरमध्ये पाचव्या मजल्यावर कुलकर्णी कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी त्यांची १८ महिन्यांचे मांजर गॅलरीच्या सज्जावर अचानक गेले होते. त्या मांजराला तेथून घरात येता येत नव्हते. तेथे अडकून पडल्याने ते मांजर जोरजोरात ओरडत होते. ही बाब कुलकर्णी कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने धाव घेतली. कुलकर्णी कुटुंब हे पाचव्या मजल्यावर राहत असल्याने आणि त्या घराच्या गॅलरीच्या सज्जावर ते अडकून पडले होते. त्या मांजराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुरु वातीला दोरीचा वापर करण्यात आला. पण, काही केले तो मांजर हाती येत नव्हता. आई कुठे काय करते या मराठी मालिकेतील गौरी ही भूमिका या अभिनेत्री साकारली आहे.
अखेर आपत्ती कक्षाच्या पथकाने त्या मांजराला गॅलरीच्या ग्रीलमधून हात टाकून त्याला पकडले. जवळपास तासभराने पथकाने त्या मांजराला सुखरूप बाहेर काढले. यावेळी कुलकर्णी कुटुंबांनी पथकाने आभार मानले. ते मांजर १८ महिन्यांचे असून ती मादी आहे. सुरु वातीला मांजरीला सुखरूप बाहेर काढणे एवढेच लक्ष होते. त्यामध्ये आम्हाला यश आले आहे. मिस्टी हे मांजर गौरी कुलकर्णी यांचे असल्याची माहिती आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.