भाजप पदाधिकाऱ्याकडून पालिकेच्या बोधचिन्हाचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:49+5:302021-03-14T04:35:49+5:30

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती भाजपचे प्रशांत केळुस्कर हे पालिकेचे बोधचिन्ह, पालिकेचे नाव व स्थायी समिती ...

Misuse of municipal logo by BJP office bearers | भाजप पदाधिकाऱ्याकडून पालिकेच्या बोधचिन्हाचा गैरवापर

भाजप पदाधिकाऱ्याकडून पालिकेच्या बोधचिन्हाचा गैरवापर

Next

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती भाजपचे प्रशांत केळुस्कर हे पालिकेचे बोधचिन्ह, पालिकेचे नाव व स्थायी समिती सभापतीचा बेकायदा फलक लावून लोकांची फसवणूक करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्यकाम फाउंडेशनने केली आहे. केळुस्कर हे नगरसेवकही नसल्याचे फाउंडेशनने निदर्शनास आणून दिले आहे.

माजी आमदार नरेंद्र मेहतांचे निकटवर्तीय असलेले केळुस्कर हे त्यांच्या कारवर स्थायी समिती सभापती असल्याची पाटी लावून फिरतात. पाटीवर मीरा-भाईंदर महापालिका असे लिहिलेले असून, महापालिकेचे नोंदणीकृत असलेले बोधचिन्ह व नावाचा झेंडाही गाडीच्या दर्शनी भागात लावलेला आहे, असे फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता म्हणाले. केळुस्कर यांच्यावर शहरात अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडून पालिकेच्या नावाने फलक लावून त्याचा गैरप्रकारासाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालिका आयुक्त दिलीप ढोले व पालिका विधी अधिकारी सई वडके यांच्याकडे लेखी केली आहे.

केळुस्कर हे ऑगस्ट २०१२ ते २०१७ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. पाच वर्षांपूर्वी ते स्थायी समितीचे सभापती होते. पण आजही ते कारवर पालिकेचे नाव , पद व बोधचिन्ह बेकायदा लावून फिरत असल्याबद्दल टीका होत आहे.

---------------------------------

कोट

मी पूर्वी सभापती होतो, त्याचा अभिमान असल्याने कारवार नामफलक तसाच ठेवला आहे. मी फलक लावून गैरवापर केलेला नाही.

- प्रशांत केळुस्कर, भाजप पदाधिकारी

पालिकेचे बोधचिन्ह, नाव याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचा ठराव झाला असून, तो तपासून पाहून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संबंधित विभागाने कळविले आहे.

- राज घरत, जनसंपर्क अधिकारी

Web Title: Misuse of municipal logo by BJP office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.