भाईंदरमधील बाळासाहेब ठाकरे मैदानाचा दुरुपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:30 AM2019-04-11T00:30:55+5:302019-04-11T00:30:57+5:30

धार्मिकऐवजी व्यावसायिक कार्यक्रम : खरकटे अन्न, कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य, नागरिक संतप्त

misused of Balasaheb Thackeray ground in Bhainendar | भाईंदरमधील बाळासाहेब ठाकरे मैदानाचा दुरुपयोग

भाईंदरमधील बाळासाहेब ठाकरे मैदानाचा दुरुपयोग

Next

भार्इंदर : महापालिकेच्या भार्इंदरमधील बाळासाहेब ठाकरे मैदानात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली परवानगी घेऊन व्यावसायिक कार्यक्रम करण्यात आला. इतकेच नव्हे तर मैदानातील खरकटे अन्न, कचरा टाकून दुरवस्था करण्यात आली. गवत नष्ट करण्यासह विजेच्या चोरीचा प्रकारही आयोजकांनी केला असतानाही महापालिका कारवाईस टाळाटाळ करत आहे. तर, मैदानाची दुरवस्था झाल्याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनीही तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.


भार्इंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीमध्ये एकमेव हे मैदान आहे. हे मैदान मोठे असून सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासह व्यायाम, योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. शिवाय, मुलांना खेळण्यासाठी हेच एकमेव मैदान आहे. एमआरटीपी कायद्यानुसार मैदान केवळ वर्षातून ३० दिवसांसाठी धार्मिक आणि राष्ट्रीय दिवस, महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमासाठीच देणे बंधनकारक आहे. त्यातही मुले, नागरिकांना खेळण्यास मिळावे म्हणून शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मैदाने भाड्याने देऊ नये, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. प्रभाग समिती कार्यालय व काही कर्मचारी, लोकप्रतिनिधी-राजकारण्यांच्या संगनमताने सर्रास नियम-निर्देशांचे उल्लंघन केले जात आहे. शिवाय, मैदान भाड्याने दिल्याने होणाऱ्या कार्यक्रमांमुळे गवत नष्ट होऊन लाखो रुपयांचे नुकसान पालिकेचे होत आहे.


५ व ६ एप्रिलसाठी प्रभाग समिती-४ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी विनोद सिंह व सुनील जैन यांच्या नावे धार्मिक कार्यक्रमासाठी म्हणून ठाकरे मैदान भाड्याने दिले होते. दोन दिवसांचे मिळून १० हजार भाडे व सुमारे १३ हजार अनामत रक्कम घेण्यात आली.
परंतु, ६ एप्रिल रोजी मैदानासमोरील इमारतीत एका बिल्डरच्या कार्यालयाचे उद्घाटन होते. यानिमित्ताने मैदानात भव्य स्टेज, रोषणाई, जेवणाची व्यवस्था केली होती. मोठ्या संख्येने गॅस सिलिंडरचा वापर केला गेला.


या कार्यक्रमास बिल्डरने अभिनेता जितेंद्र तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांना बोलावले होते. बिल्डरांच्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. शिवाय, नृत्याचाही कार्यक्रम झाला. जनरेटर असले तरी पालिकेच्या वीजजोडणीतून चोरीने वीजपुरवठा घेण्यात आला होता. दुसºया दिवशी सकाळी जेव्हा नागरिक फिरायला आले, तेव्हा मैदानात घाण पाणी, खरकटे व कचरा पडला होता. दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. मुलांना खेळणे तर दूर नागरिकांनी फेरफटका मारणेही टाळले.
घडल्या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आयोजकांसह बेजबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: misused of Balasaheb Thackeray ground in Bhainendar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.