राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात भिवंडीच्या मितेश विसपुते याने पटकावला प्रथम क्रमांक
By नितीन पंडित | Published: February 5, 2024 04:49 PM2024-02-05T16:49:33+5:302024-02-05T16:49:59+5:30
केंद्र शासनाच्या नीती आयोगातर्फे बंगलोर येथे स्टेम पार्क इनोव्हेशन फिस्ट या बाल वैज्ञानिक स्पर्धेचे व विज्ञान प्रदर्शनाचे राष्ट्रीय स्तरावर १ व २ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.
भिवंडी: बेंगलोर येथे नीती आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मितेश विसपुते याने भारतीय सीमा दलाची सुरक्षा या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाची देशभरातून प्रशंसा होत असून त्याच्या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरी नंतर मितेश विसपुते याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्षा श्रीमती अरुणा जाधव,शालेय समितीचे अध्यक्ष श्रीराम भोईर,सर्व व्यवस्थापन मंडळातील पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर घागस, उपमुख्याध्यापक आर.एस.शिंदे, पर्यवेक्षक व्ही.ए. मोरे,आर.एच.जाधव,ज्ञानेश्वर गोसावी यांसह सर्वांनीच मितेशचे अभिनंदन केले आहे.
केंद्र शासनाच्या नीती आयोगातर्फे बंगलोर येथे स्टेम पार्क इनोव्हेशन फिस्ट या बाल वैज्ञानिक स्पर्धेचे व विज्ञान प्रदर्शनाचे राष्ट्रीय स्तरावर १ व २ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान भिवंडी शहरातील सुप्रसिद्ध पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मितेश विसपुते यास मिळाला होता.या बाल वैज्ञानिक स्पर्धेत मितेशने भारतीय सीमा दलाच्या जवानांसाठी सुरक्षा (Safe Gaurd For Border Security Force) हा अनोखा प्रकल्प सादर केला होता.
भारतीय सीमांवर घुसखोरी करणाऱ्या आतंकवाद्यांना इंडिकेटरच्या माध्यमातून पकडता येऊ शकतो तसेच भारतीय सीमेत अवैध दाखल होणारे आतंकवाद्यांचे विमान अथवा हेलिकॉप्टर रडार यंत्रणेद्वारे पकडता येऊ शकतो अशा प्रकारचा प्रकल्प मितेशने बनवला होता जो सर्वांनाच आवडला.यासाठी लर्निंग लिंक फाउंडेशनचे असिस्टंट मॅनेजर अर्चित धाडसी तसेच शाळेचे विज्ञान शिक्षक परेश मोरे यांनी मितेशला मार्गदर्शन केले होते.
मितेश यांच्या या यशा नंतर निती आयोगाच्या मिशन डायरेक्टर अटल इनोवेशनचे डॉ.चिंतन वैष्णव,प्रेक्षपणास्त्र वैज्ञानिक अग्निपुत्री डॉ.टेसी थॉमस यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन मितेश ने सादर केलेल्या प्रकल्पाची प्रशंसा केली आहे. कर्नाटक राज्याचे समग्र शिक्षा अभियान प्रकल्पाचे संचालक के.एन.रमेश,एशिया स्पेसिफिक ग्लोबल डिलिव्हरी ऑफ एक्सलन्स चे अध्यक्ष राकेश अहिरत,रिस्क मॅनेजमेंट डिलिव्हरी इन्शुरन्सच्या उपाध्यक्षा विद्या नटराज,लर्निंग लिंक फाउंडेशनच्या अध्यक्षा न्यूरिया अन्सारी, वैज्ञानिक प्रकल्पाचे व्यवस्थापकीय मंडळाचे अश्विन श्रीवास्तव,सुमन पंडित,सुरज मेनॉन या सर्वांनी मितेशच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक केले.