"मोठे सीएम एकनाथ शिंदे, तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे"; आमदार आयलानींच्या विधानावर, श्रीकांत शिंदे म्हणाले...
By सदानंद नाईक | Published: December 25, 2022 06:29 PM2022-12-25T18:29:01+5:302022-12-25T18:29:29+5:30
उल्हासनगर व कल्याणला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले.
उल्हासनगर- उल्हासनगर व कल्याण शहराला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा छोटे सीएम असा उल्लेख केला. खासदार शिंदे यांनी मात्र मी पक्षाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचे सांगितले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर येथे कल्याण व उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या वालधुनी नदीवर साडे पाच कोटीच्या निधीतून पर्यायी नवीन पूल बांधण्यात आला. वाहनांना वालधुनी नदीवरील नवीन पूल खुला करण्याची मागणी झाल्यावर, रविवारी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन होऊन पूल खुला करण्यात आला. उदघाटन वेळी आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील धोकादायक इमारती पुनर्बांधणी विधेयकाला नागपूर अधिवेशनात मंजुरी दिल्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. तसेच पर्यायी पुलाचे उदघाटन झाल्याने, वाहतूक कोंडी निकाली निघाले असून शहरातील डांबरीकरण रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी खासदार शिंदे यांच्याकडे आयलानी यांनी केली. मोठे सीएम एकनाथ शिंदे तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे असा उल्लेख आयलानी केल्यावर, सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
मोठे सीएम एकनाथ शिंदे, तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे - आमदार कुमार आयलानी#SrikanthShinde#CMEknathshindepic.twitter.com/vUK2pYIz5X
— Lokmat (@lokmat) December 25, 2022
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहरविकास निधीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच आयलानी यांनी छोटे सीएमचा उल्लेख केला असला तरी राज्याचा गाडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत असल्याचे खासदार शिंदे म्हणाले. मी एक पक्षाचा कार्यकर्ता असून त्यानुसार काम करीत आहे. अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. उद्घाटनला पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर लिलाबाई आशान, नाना बागुल, राजेंद्र चौधरी, राजेंद्र सिंग भुल्लर, मनीषा भानुशाली, धीरज ठाकूर बाळा श्रीखंडे आदीजन उपस्थित होते.