उल्हासनगर महापालिका आयुक्तांना आमदार आयलानीकडून आंदोलनाचा इशारा
By सदानंद नाईक | Published: April 12, 2023 05:27 PM2023-04-12T17:27:13+5:302023-04-12T17:27:54+5:30
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या समवेत बुधवारी आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील विविध समस्या बाबत विशेष बैठक घेतली.
उल्हासनगर : महापालिकेने रिजेन्सी-अंटेलिया येथे उभारलेले रुग्णालय सुरू करा, रस्त्यातील खड्डे भरा, पाणी टंचाई दूर करा आदी अनेक समस्यांचे निवेदन आमदार कुमार आयलानी यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिले. तसेच समस्याचे निवारण झाले नाहीतर, आंदोलन करण्याचा इशारा आमदार आयलानी यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिला.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या समवेत बुधवारी आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील विविध समस्या बाबत विशेष बैठक घेतली. शहरात गेल्या दोन दिवसापासून पाणी पुरवठा समस्या उभी टाकल्याने, अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाल्याचे बैठकीत आमदार आयलानी यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, रस्त्यातील खड्डे भरणे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून रिजेन्सी-अंटेलिया येथे उभारलेला २०० बेडचे रुग्णालय सुरू करा, आदी समस्या मांडून त्याबाबतचे निवेदन आयुक्त अजीज शेख यांना दिले. या समस्या तातडीने सोडल्या नाहीतर आंदोलनाचा इशारा आमदार आयलानी यांनी आयुक्तांना दिला आहे.
महापालिका आयुक्ता समवेत घेतलेल्या आढावा बैठकीला आमदार आयलानी यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष जमनू पुरुस्वानी, राजेश वधरिया, माजी नगरसेवक राम चार्ली, प्रकाश माखिजा, लाल पंजाबी, महेश सुखरामानी आदीजन उपस्थित होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, शहर अभियंता प्रशांत सोळंके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.