उल्हासनगर महापालिकेतील रिक्त जागेसह विकास कामासाठी आमदार आयलानी यांचे साकडे
By सदानंद नाईक | Published: June 28, 2024 04:56 PM2024-06-28T16:56:14+5:302024-06-28T16:57:37+5:30
उल्हासनगर महापालिकेत बहुतांश प्रमुख पदे रिक्त असल्याने, महापालिकेचा कारभार लिपिक दर्जाच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात गेला. तसेच भरती प्रक्रियेला ब्रेक लागल्याने, कंत्राटी कामगारांचा बोलबाला आहे.
उल्हासनगर : महापालिकेतील रिक्त जागेसह अवैध बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी आदी विकास कामासाठी आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन साकडे घातले. महापालिकेत रिक्त पदामुळे सावळागोंधळ निर्माण जाऊन त्याचा परिणाम विकास कामावर होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत बहुतांश प्रमुख पदे रिक्त असल्याने, महापालिकेचा कारभार लिपिक दर्जाच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात गेला. तसेच भरती प्रक्रियेला ब्रेक लागल्याने, कंत्राटी कामगारांचा बोलबाला आहे. महापालिकेत ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया रखडली आहे. तसेच अनधिकृत विकास कामे नियमित करण्यामध्ये, आधिनियम २००६ व सुधारित अधिनियम २०२२ ची अंमलबजावणी करण्यास येत असलेल्या अडचणी, शहराला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी वाढवून मिळणे, मध्यवर्ती हॉस्पिटल मधील रिक्त पदे तातडीने भरणे, मध्यवर्ती हॉस्पिटल मध्ये नवीन ४०० खाटाचे बांधण्याबाबत च्या प्रस्तावास मान्यता मिळणे, वालधुनी नदी मध्ये केमिकल सोडणाऱ्यावर कडक कार्यवाई कारवाई करणे, मेडिकल कॉलेज सुरू करणे, उल्हासनगर स्टेशन येथील स्काय वॉक दुरुस्ती करणे, स्वतःची पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आदी मागण्या आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केल्या. तसेच मागण्याचें निवेदन दिले आहे.
शहरातील अनधिकृत चालणाऱ्या अनैतिक धंद्यावर कार्यवाही करणे, कॅम्प नं-३ येथील शांतीनगर मुख्य प्रवेशद्वार ते साईबाबा मंदीर पर्यंत उड्डाणपूल बांधणे, महापालिकेची नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता देणे, शहरातील अवैध बांधकामाना देय मालमत्ता कराचा दुपट्ट आकारण्यात आलेली शास्ती कर माफ करणे आदी मागण्या निवेदनात आहेत. आमदार आयलानी यांनी दिलेल्या निवेदनाचा मुख्यमंत्रीकडून विचार होतो की नेहमीप्रमाणे बाजूला ठेवले जाते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.