उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरणार, आमदार आयलानी यांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे
By सदानंद नाईक | Published: January 31, 2023 08:45 PM2023-01-31T20:45:26+5:302023-01-31T20:46:00+5:30
यावेळी रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे उपस्थित होते.
उल्हासनगर : मध्यवर्ती जिल्हास्तरीय रुग्णालयात डॉक्टरसह अन्य पादे रिक्त असल्याने, रुग्णांची हेळसांड होत आहे. आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली. यावेळी रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे उपस्थित होते.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ९५० पेक्षा जास्त रुग्णाची नोंदणी होते. मात्र रुग्णाच्या प्रमाणात डॉक्टर, नर्स, तज्ञ डॉक्टर, वॉर्डबॉय आदींची संख्या कमी असून मंजूर पदे सन-१९८३ ची आहेत. रुग्णालयातील रिक्त पदासह इतर सोय सुखसुविधा उपलब्ध करणे बाबत आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर यांच्यासह भाजपचे शहर पदाधिकारी, रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे आदी जणांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात मंगळवारी विशेष बैठीक घेतली. मंत्रीमहोदय यांनी रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली.
मध्यवर्ती हॉस्पिटल शेजारील मोकळ्या जागेवर नर्सिंग स्कूल तसेच हॉस्पिटल साठी नवीन तळमजला अधिक चार मजल्याची इमारत बांधण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून शवागृहाचे काम संथगतीने सुरू असून नेत्र विभागातील शस्त्रक्रिया विभागाचे नुतनीकरण व अंतर्गत रस्त्याचे काम ठप्प पडल्याची टीका होत आहे. गेल्या महिन्यात आमदार बालाजी किणीकर व कुमार आयलानी यांनी या मंजूर कामाचा आढावा घेऊनही कामाला वेग आला नसल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. तर रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी शवागृहाचे काम संथगतीने सुरू असल्याचे सांगून इतर कामे ठप्प असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.