आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद
By सदानंद नाईक | Published: March 15, 2024 07:53 PM2024-03-15T19:53:02+5:302024-03-15T19:54:37+5:30
शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता.
उल्हासनगर: भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांच्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहर विकास कामात भ्रष्टाचार होत असल्याचे वक्तव्य गुरुवारच्या पत्रकार परिषदेत केल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या विकास कामात भ्रष्टाचार आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला असून भाजप नेत्यांची खदखद केंव्हाही बाहेर पडण्याची शक्यता आहे.
उल्हासनगरात कधी नव्हे हजारो कोटीच्या निधीतून विकास कामाला सुरवात झाली. मात्र या विकास कामावरून शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकारी आमने-सामने आले आहे. दिड महिन्यांपूर्वी शहरातील विविध विकास कामात अनियमितता असल्याचा आरोप भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. १०० कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून खळबळ उडून दिली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकार्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता.
शहरातील बांधकामे व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी शासनाने, नव्याने अध्यादेश काढल्याच्या निमित्ताने गुरवारी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली होती. बैठकीला आमदार आयलानीसह शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, प्रकाश नाथानी आदीजन उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहर विकास कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी त्यांची समजूत काढून बोलण्यास मनाई केली. तरीही मी वेगळी पत्रकार परिषद घेतो. असे पुरस्वानी म्हणाले. यांप्रकाराने शहरातील विकास कामात भ्रष्टाचार सुरू असल्याची चर्चा रंगली असून भाजप नेत्यात या भ्रष्टाचाराबाबत खदखद असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
महायुतीच्या नेत्यांची पत्रकार
परिषद शासनाने बांधकामे नियमित करण्याचा जीआर काढला असून रेडिरेकनर दर १० टक्के ठेवला. त्यामुळे बांधकाम नियमित करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यासाठी गुरवारी भाजपने पत्रकार परिषद घेत दिली. मात्र त्याच विषयावर महायुतीतील नेत्यांनी शुक्रवारी पुन्हा पत्रकार घेतली. यावेळी आमदार आयलानी, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, शिवसेनेचे अरुण अशान, रमेश चव्हाण, नाना बागुल, राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री, रिपाइंचे भगवान भालेराव आदीजन उपस्थित होते.