आमदार निधी कंत्राटदाराच्या घशात?
By admin | Published: May 30, 2017 05:30 AM2017-05-30T05:30:35+5:302017-05-30T05:30:35+5:30
पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांच्या आमदार निधीतून ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांच्या आमदार निधीतून ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे २० लाखांचा निधी दिला. त्यातून झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून हा निधी कंत्राटदारांच्या घशात गेल्याचा आरोप होत आहे. मुरबाड तालुक्यातील न्हावे सासणे ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला असून ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
या गावाला निरंजन डावखरे यांनी भेट दिली आणि ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून मदतीचा हात म्हणून आपल्या आमदार निधीतून सुमारे २० लाख रु पये दिले. मात्र, त्या निधीतून शाळेसाठी काँक्रिट रस्ता, बौद्ध वस्तीतील रस्ते, आदिवासी बांधवांसाठी विविध सोयीसुविधा पुरवणे, अशी विधायक कामे न करता गावातील गल्लीबोळांतील, पूर्वी झालेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची किरकोळ दुरु स्ती केली. सासणे-न्हावे या गावांना जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने त्या रस्त्यावर १० ते १५ लाख वापरून त्या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, ते कामही निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्या रस्त्याची केवळ किरकोळ डागडुजी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डांबरीकरणात तीन थरांऐवजी दोनच थर टाकले आहेत. रस्त्याच्या बाजूला कडक मुरूम भरण्याऐवजी माती भरली आहे. त्यासाठी तब्बल १५ लाख खर्च दाखवण्यात आल्याची चर्चा आहे.