आमदार गायकवाड व महेश गायकवाड वाद पेटणार; द्वारली येथील वादग्रस्त जमीन मोजणीवरून राडा
By सदानंद नाईक | Published: September 2, 2024 08:07 PM2024-09-02T20:07:49+5:302024-09-02T20:08:32+5:30
संशयित इसमाकडून गावठी कट्टा, कोयता, चॉपर आदी घातक शस्त्र दिली शेतकऱ्यांनी पकडून, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
सदानंद नाईक, उल्हासनगर : द्वारलीगावातील सर्वे नं-६ ज्या वादग्रस्त जमिनीच्या मोजणीवेळी शेतकरी व विकासकांच्या समर्थकात सोमवारी दुपारी १ वाजता राडा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी पकडलेल्या संशयित इसमाकडून गावठी कट्टा, कोयता, चॉपर, आदी घातक शस्त्र पकडून हिललाईन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. याच वादग्रस्त जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात यापूर्वी गोळीबार झाल्याचे बोलले जाते.
शहराच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये शिंदेंसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह अन्य जनावर गोळीबार केल्याने राज्यात खळबळ उडून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. महेश गायकवाड रुग्णालयातून उपचार करून सुखरूप बाहेर आले असून आमदार गणपत गायकवाड जेलची हवा खात आहेत. मात्र द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीचा वाद पुन्हा उफाळून आला. सोमवारी दुपारी १ वाजता द्वारली गावातील वादग्रस्त जमीनची मोजणी करण्यासाठी भूमापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. यावेळी विकासक व त्यांचे समर्थक मंडळी उपस्थित होते.
जमीन मोजणीला स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी महेश गायकवाड यांना माहिती दिल्यावर ते समर्थकासह घटनास्थळी धावून आले. शेतजमीन मोजणी वेळी शेतकरी व विकासकांच्या समर्थकात तू तू मैं झाल्यावर, शेतकऱ्यांनी संशयित इसमाच्या बैग तपासल्या असत्या, त्यामध्ये गावठी कट्टा, कोयता, चॉपर आदी घातक शस्त्र मिळाली. यादरम्यान हिललाईन पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर शस्त्रासह संशयित काही इसमाना ताब्यात घेऊन हिललाईन पोलीस ठाण्यात घेऊन आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शस्त्र व काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. याप्रकाराने पुन्हा आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्यात ठिणगी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
नोटिसा न देता मोजणी कधी...महेश गायकवाड
वादग्रस्त जमिनीची मोजणीची शेतकऱ्यांना नोटिसा न देता भूमापन अधिकारी जागेची मोजणी कशी करू शकतात?. तसेच मोजणी ठिकाणी शस्त्र घेऊन येणारे इसम कोण? आदींच्या चौकशीची मागणी महेश गायकवाड यांनी पोलिसांना केली. तसेंच फरार असलेला वैभव गायकवाड याच परिसरात फिरत असल्याचा आरोप केला.