आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला जेसीबीचा ताबा; आशेळेपाड्यात नालेसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:48 PM2019-06-04T23:48:46+5:302019-06-04T23:48:56+5:30
गणपत गायकवाड यांनी तेथे पोहोचून चक्क नालेसफाई करणाऱ्या जेसीबी चालकाच्या केबीनचा ताबा घेत त्याच्याकडून नाल्यातील गाळ काढून घेतला.
कल्याण : केडीएमसी दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, नालेसफाईचे केवळ व्हिडीओ शुटिंग केले जाते. प्रत्यक्षात नालेसफाई होत नाही. तो केवळ एक दिखावा असतो, अशी टीका होत असल्याने आयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत पूर्वेतील आशेळेपाडा येथे नालसफाई सुरू असताना तेथे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी तेथे पोहोचून चक्क नालेसफाई करणाऱ्या जेसीबी चालकाच्या केबीनचा ताबा घेत त्याच्याकडून नाल्यातील गाळ काढून घेतला.
‘प्लास्टिक कचºयामुळे तुंबले नाले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’ पुरवणीत ३ जूनला वृत्त प्रसिद्ध झाले होते. तर, ४ जूनच्या अंकात ‘शूट-आउट’ या सदरात तुंबलेल्या नाल्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल करण्यात आली. गायकवाड यांनी त्याची दखल घेत नालेसफाईच्या कामात सहभाग घेतला. ते पाहून बोडके हेही चक्रावून गेले.
पावसाळा आला तरी कल्याण पूर्वेतील नाल्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. तर, अनेक नाल्यांतील गाळ व कचरा काढून तेथेच टाकण्यात आला आहे. त्यामुळे पादचारी व रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या कंत्राटदाराने सोमवारीच स्वच्छ केलेल्या नाल्यात मंगळवारी मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचले आहे.
बोडके यांनी स्वत:च मंगळवारी ठिकठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्याने या कामाला गती आल्याचे दिसून आले. आयुक्त स्वत: पाहणी करीत असल्याने आशेळेपाडा येथील नाल्यातील गाळ काढण्यात येत असलेल्या ठिकाणी गायकवाड यांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी चक्क जेसीबीचा ताबा घेतला. पायात गमबूट घालून नाल्यात उतरण्याची त्यांची तयारी होती.
पहिल्या पावसातच नाले तुंबतात
गायकवाड म्हणाले की, नालेसफाई दरवर्षी योग्य प्रकारे केली जात नाही. नालेसफाईचा दिखावा केला जातो. त्यामुळे पहिल्या पावसात नाले तुंबतात. साचलेले पाणी नागरिकांच्या चाळवजा घरांमध्ये शिरते. पूरसदृश परिस्थिती उद्भवते. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार केला जातो. नालेसफाईच्या कामातून अधिकारी व लोकप्रतिनिधी आपले खिसे भरण्यात धन्यता मानतात. त्यामुळे नालेसफाई होतच नाही. ही बाब लक्षात घेता आज प्रत्यक्ष नालेसफाई कामाच्या ठिकाणी गेल्यावर काम गतीने करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.