सरकार मच्छिमार, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार गीता जैन यांचे आश्वासन
By धीरज परब | Published: May 25, 2023 06:43 PM2023-05-25T18:43:23+5:302023-05-25T18:43:45+5:30
"उत्तन वासियांची राहती घरे सुरक्षितच"
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन, चौक, पाली, डोंगरी, तारोडी गावातील स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार व शेतकऱ्यांच्या सरकारी जमिनी वरील पूर्वी पासूनची राहती घरे ही सुरक्षित असून राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणी समाजकंटक भूमिपुत्रांना घाबरवत असेल तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही, अशी ग्वाही आमदार गीता जैन यांनी उत्तन येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत दिली .
सदर गावांमध्ये भूमिपुत्र हे पिढ्या न पिढ्या रहात असून काही शासनाने देखील धोरण निश्चित करून राहती घरे संरक्षित केलेली आहेत. तरी देखील काही समाज कंटक हे भूमिपुत्रांच्या पिढीजात घरां बाबत तक्रारी करून त्यांना वेठीस धरत आहेत. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर अपर तहसीलदार निलेश गौंड यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणांना नोटीस बजावल्या नंतर समाज कंटक लोकां मध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप आ. गीता जैन यांनी संत पिटर कोळी जमात सभागृहात गुरुवारी बैठकी दरम्यान केला.
यावेळी अपर तहसीलदार निलेश गौंड, महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड, मंडळ अधिकारी दिपक अहिरे, पोलीस निरीक्षक दादासाहेब करांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत वैती. राहिदास पाटील व शरद पाटील, कलमेत गौऱ्या (पाटील), शैलेश मामुनकर, ज्युड सामऱ्या, ऑस्टीन सामऱ्या, प्रकाश कोळी, बाबू कांबळे तसेच स्थानिक कोळी बांधव उपस्थित होते.
ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही . या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी देखील स्थानिक भूमिपुत्रांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खात्री दिली असल्याची माहिती आ. जैन यांनी दिली.
ग्रामस्थानी त्यांच्या मनातील शंका बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यासमोर मांडल्या असता त्यांच्या शंकांचे योग्य ते निरासन करण्यात आले. काही समाजकंटक स्थानिकामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरवीत असून अश्या गैरसमजाला बळी न पाडण्याचे आवाहन जैन यांनी ग्रामस्थांना केले.